चिपळूण : भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशातील रोर्इंग जिल्ह्यात चीनच्या सीमेवर सेवा बजावत असताना तालुक्यातील ताह्मणमळा गवळवाडी येथील जवान जयेंद्र राजाराम तांबडे (वय ३४) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशातील उंच अशा ठिकाणी प्राणवायू कमी पडल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सोमवारी (दि. २ जुलै) सकाळी ८.३० वाजता त्यांचे निधन झाले.रोर्इंग जिल्ह्यात पायोनियर कंपनीमध्ये जयेंद्र तांबडे हे शिपाई पदावर होते. मंगळवारी सकाळी ही माहिती तालुक्यात पसरली. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला व आॅक्सिजनची कमतरता भासल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला.या हिल स्टेशनवरून त्यांना मोटारीने अरुणाचल प्रदेशातील सैन्याच्या रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांची प्राणज्योत मालवली. २००८ मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. त्यांचे दोन चुलत बंधू सैन्यात आहेत. अवघ्या ३४ व्या वयाच्या जवानाचा अकाली मृत्यू झाल्याने तांबडे कुटुंबीयांनाच नाही तर पंचक्रोशीला धक्का बसला आहे.जवान जयेंद्र यांचे आई-वडील ताह्मणमळा येथे शेती करतात. त्यांचीपत्नी प्रियांका दोन लहानमुलांसह चिपळूणमध्ये राहते. दोन भाऊ मुंबईमध्ये कामाला आहेत. सैन्यामध्ये असलेले त्यांचे चुलत भाऊ प्रवीण तांबडे हे सुटीनिमित्त गावाला आले होते. येथेच त्यांना ही दु:खद बातमी कळली. त्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत.रात्री उशिरा पार्थिव आणणारहवामान खराब असल्यामुळे अरुणाचल प्रदेशमधून त्यांचा मृतदेह आणण्यास उशीर झाला. रोहिंग येथील दिब्रुगड, त्यानंतर कोलकाता येथून विमानाने मुंबई येथे त्यांचा मृतदेह आणण्यात आला.मंगळवारी सायंकाळी उशिरा ताह्मणमळा येथे त्यांचे पार्थिव आणले जाणार आहे. आज, बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दोन लहानगीजयेंद्र यांचा मुलगा अंकित साडेतीन वर्षांचा, तर मुलगी आर्या फक्त सव्वा वर्षाची आहे. त्यामुळे जयेंद्र यांच्या अशा अकाली जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
ताह्मणमळा येथील जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:50 IST