तरुण अभियंत्यामुळे घाटरस्ता लवकर मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST2021-07-29T04:31:03+5:302021-07-29T04:31:03+5:30
राजापूर : दरड कोसळून आणि महापुरामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले. त्यात राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाचाही ...

तरुण अभियंत्यामुळे घाटरस्ता लवकर मोकळा
राजापूर : दरड कोसळून आणि महापुरामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले. त्यात राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाचाही समावेश होता. या घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या वाटा बंद झाल्यामुळे भाजीपाला, दूध, पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण झाली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तरुण अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी अणुस्कुरा घाटात अखंड काम करुन हा मार्ग दोन दिवसात मोकळा केला. त्यामुळे महत्त्वाच्या वाहतुकीला खूप मोठा आधार मिळाला.
दि. २२ जुलैचा महाप्रलयंकारी पाऊस आणि त्यामुळे आलेल्या महापुराने लोक गर्भगळीत झालेले असताना तालुक्यातील एकमेव अणुस्कुरा घाटात तीन दरडी कोसळल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले. कोल्हापूरशी संपर्क असलेले अनेक घाट दरडी कोसळल्याने ठप्प झाले. यामुळे कोल्हापूर, मलकापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचा संपर्कच खंडित झाला. त्यामुळे जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलची तीव्र टंचाई निर्माण झाली.
अशा कसोटीच्या क्षणी स्वप्नील बावधनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असुरक्षित स्थितीतही अणुस्कुरा घाटात धाव घेतली. घाटातील धोकादायक कठड्यांवर आणि दरडी कोसळत असलेल्या ठिकाणी उभे राहून त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने घाटरस्ता मोकळा करण्यास सुरूवात केली. या टीमने केलेल्या दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांमुळे घाटातून प्रथम एकेरी व नंतर दुहेरी वाहतूक सुरू झाली. त्याचा खूप मोठा दिलासा जिल्ह्याला मिळाला.