बोगस कामावरुन नगरसेवकांत ‘तू तू...’

By Admin | Updated: July 13, 2015 00:40 IST2015-07-12T23:06:47+5:302015-07-13T00:40:05+5:30

चिपळूण पालिका : गटाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे

'You Tu ...' by bogus workers | बोगस कामावरुन नगरसेवकांत ‘तू तू...’

बोगस कामावरुन नगरसेवकांत ‘तू तू...’

चिपळूण : शहरातील नगर परिषदेतील एका सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकामध्ये गटाराच्या कामावरुन तू तू मैं मैं... सुरु झाले आहे. सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने गटाराच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे विरोधी गटातील गटनेत्याने फोनवरुन धमकीवजा जाब विचारल्याने पुन्हा एकदा गटार कामाच्या विषयाची चर्चा रंगू लागली आहे.
शहरातील बेंदरकरआळी येथील नवा कालभैरव मंदिर ते प्रमोद पवार घरापर्यंत अंदाजे १५० मीटर गटाराचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. हे काम बोगस झाल्याची तक्रार सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने मुख्याधिकारी प्रकाश पाटील व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्याकडे केली होती. असे असतानाही संबंधित ठेकेदाराला कामाचे बिलही देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे काम शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने केले आहे. या तक्रारीमुळे विरोधी गटातील नगरसेवकाला याचा राग आला व शनिवारी सत्ताधारी गटातील त्या नगरसेवकास गटनेत्याने फोन केला. ‘तू गटाराच्या कामाची तक्रार का केलीस?’ असा जाब विचारला. मात्र, काम चांगले झाले आहे की नाही, हे अभियंता ठरवेल, असे उत्तर संबंधित नगरसेवकाने दिले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ‘तू जर नगर परिषदेच्या विरोधात जात असशील तर आम्ही बघून घेऊ’, असा इशारा विरोधी गटाच्या नगरसेवकाने दिला आहे.
दरम्यान, मोबाईलवरील हे संभाषण तक्रारदार नगरसेवकाने रेकॉर्ड केले असून, ते व्हॉट्सअपवर टाकले आहे. याची जोरदार चर्चा परिसरात सुरु आहे. गेल्या महिन्यात खेंड -बावशेवाडी येथेही गटाराचे काम निकृष्ट झाल्याचे उघड झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांचे गटार अथवा विकासकामांवर किती लक्ष आहे, हे या घटनांवरुन पुढे आले आहे.
शहर परिसरातील कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होत आहेत की नाही, यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवल्यास बोगस कामे होणार नाहीत, यासाठी सत्ताधारी व प्रशासन यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)

सत्ताधारी-विरोधकांत जुगलबंदी

Web Title: 'You Tu ...' by bogus workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.