योगी चित्रपट श्रध्दा, विचारांवर आधारित

By Admin | Updated: July 6, 2014 01:04 IST2014-07-06T00:52:57+5:302014-07-06T01:04:05+5:30

चंद्रकांत गायकवाड : कोकणचे टेंब्येस्वामी रुपेरी पडद्यावर...

Yogi Movie Shraddha, Based on Thoughts | योगी चित्रपट श्रध्दा, विचारांवर आधारित

योगी चित्रपट श्रध्दा, विचारांवर आधारित

रत्नागिरी : हिंदू धर्मातील दत्तसंप्रदाय हा अध्यात्माचा मोठा खजिना आहे. जो माणसाला अंधश्रध्दाळू नाही तर श्रध्दाळू बनवितो. सध्या अध्यात्म ही काळाची गरज आहे. योगी हा सिनेमा टेंब्येस्वामींच्या विचाराचा सिनेमा असून तो श्रध्दा व विचारावर आधारित असल्याचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी कलाकार आनंदा कारेकर, अरूण नलावडे, आसित रेडीज उपस्थित होते.
चित्रपटातून श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांचा जीवन प्रवास उलगडतो. टेंबेस्वामी यांनी दत्तसंप्रदायातील विचाराचा प्रसार केला. मानवातील श्रध्दा कमी होत चालली आहे, त्यावर भाष्य करण्यासाठी चित्रपट निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध ५० चित्रपटगृहात एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र पाच ते सहा चित्रपटगृहामध्ये हाऊसफुल्ल शो सुरू आहे. त्याला ७० टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
एकीकडे समाज प्रगल्भ होत असताना दुसरीकडे अंधश्रध्देच्या अनिष्ट प्रथांचे अवलंबन केले जात आहे. त्यामुळे समाजात चांगल्या गोष्टी हेरून सर्वात वेगळा चित्रपट असल्याचे कलाकार अरूण नलावडे यांनी सांगितले. चित्रपटात काम करताना टेंबेस्वामींबद्दल साहित्य वाचन करण्यात आले. आतापर्यत विनोदी भूमिका सादर केल्या, मात्र या चित्रपटाच्या माध्यमातून स्वामींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. धीरगंभीर, शांत भूमिका सादर करण्यापूर्वी स्वामींचा अभ्यास केला. एकूणच स्वामींच्या जीवनात घडलेला प्रवास कथानकातून सादर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
टेंबेस्वामी यांचा जन्म माणगाव येथे झाला. त्यामुळे माणगाव, वालावल, डिगस, कुडाळ आदि ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. रत्नागिरीतील संकेत गावडे व प्रथमेश या दोन कलाकारांनी चित्रपटात काम केले आहे. आजच तो रत्नागिरीत प्रदर्शित झाला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Yogi Movie Shraddha, Based on Thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.