येडगेवाडी ग्रामस्थांचे उद्या ‘रास्ता रोको’
By Admin | Updated: December 8, 2015 00:38 IST2015-12-07T23:17:35+5:302015-12-08T00:38:43+5:30
संगमेश्वर तालुका : आंदोलन काळात गाड्या बंद ठेवण्याची मागणी; वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही

येडगेवाडी ग्रामस्थांचे उद्या ‘रास्ता रोको’
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पामुळे येडगेवाडीतील ग्रामस्थांची वाहतुकीची सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाने अनेक वेळा आश्वासने देऊन अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने येडगेवाडी ग्रामस्थ बुधवार, ९ रोजी कुचांबे ते येडगेवाडी या पाटबंधारे विभागाच्या १ किलोमीटर अंतरामध्ये बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
येडगेवाडी ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने चर्चा केली. गेल्या वर्षी मे महिन्यात पाटबंधारे कार्यालय, चिपळूण येथे बेमुदत उपोषण केले होते. आमदार सदानंद चव्हाण यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने या विषयाबाबत ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला तरीही रस्त्याचे काम व इतर समस्या कायम आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे घटनास्थळी भेट देणार होते. तरीही येथील परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी देण्यात आले.
ग्रामस्थांच्या गैरसोयीबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना २६ सप्टेंबर रोजी दिले होते. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली होती. मात्र, याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. या मार्गावर मंगळवार, ८ डिसेंबरपर्यंत तोडगा निघून एस. टी. बस सुरु झाली नाही, तर सर्व ग्रामस्थ एकच निकष असणाऱ्या कुचांबे ते येडगेवाडी या पाटबंधारे विभागाच्या १ किमीमध्ये बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. यादरम्यान एस. टी. महामंडळालाही निवेदन देण्यात आले आहे. एस. टी. बस आंदोलनकर्त्यांपुढे जबरदस्तीने नेऊ नये. आंदोलनादरम्यान एस. टी. बस बंद ठेवण्यात यावी. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा तुकाराम वि. येडगे, तुकाराम सा. येडगे, अनंत येडगे, संतोष येडगे, लक्ष्मण येडगे, भागोजी झोरे आदी ग्रामस्थांनी दिला आहे. (प्रतिनिधी)