यंदाही आंंतरजिल्हा बदलीचे शिक्षक लटकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:29+5:302021-04-11T04:31:29+5:30

रत्नागिरी : जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. सुगम-दुर्गमचा वाद आणि कोरोनामुळे मागील दोन वर्षांत ...

This year too, inter-district transfer teachers will be suspended | यंदाही आंंतरजिल्हा बदलीचे शिक्षक लटकणार

यंदाही आंंतरजिल्हा बदलीचे शिक्षक लटकणार

रत्नागिरी : जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. सुगम-दुर्गमचा वाद आणि कोरोनामुळे मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या बदल्यांना खो बसला होता. नवीन आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सुमारे १००० शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने होऊ शकतात. मात्र, आंतरजिल्हा बदलीने एकाही शिक्षकाची बदली होऊ शकत नाही. कारण रत्नागिरी जिल्ह्यात १२ टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश आल्याने जिल्ह्यातील सुगम, दुर्गम भागातील शाळांची यादी नवीन निकषांप्रमाणे तयार करण्यात येणार आहे. ३१ मे, २०२१ अखेर ही बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. याद्या प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेतला जाणार आहे. बदली प्रक्रिया ६ टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. तसेच बदलीच्या ठिकाणी जो शिक्षक रुजू होणार नाही त्या शिक्षकाच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. बदली प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहे. या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या २,५७४ प्राथमिक शाळा आहेत. तर ६,९२४ शिक्षक मंजूर असून त्यापैकी सुमारे ६,००० शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांपैकी जिल्हांतर्गत बदल्या सुमारे १,००० शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. सुगम व दुर्गम क्षेत्र निश्चित केल्यानंतरच या बदल्या करण्यात येणार आहेत. शिक्षक बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेला दोनच दिवसांपूर्वी प्राप्त झाल्याने शिक्षकांचीही धावपळ सुरू झाली आहे.

जिल्हांतर्गत बदल्यांसह आंतरजिल्हा बदल्यांचे आदेशही जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या बदल्या उशिरा करण्यात आल्या असल्या तरी शासनाच्या धोरणानुसारच करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील ३२४ शिक्षकांच्या बदल्या आंतरजिल्हा बदलीने झाल्या होत्या. मात्र, नियमानुसार त्यापैकी केवळ ४४ शिक्षकच आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यात गेले. उर्वरित २८० शिक्षक बदली होऊनही लटकले होते. कारण १२ टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांचे पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. १० टक्क्यांपेक्षा कमी पदे रिक्त असल्यासच आंतरजिल्हा बदलीने शिक्षक अन्य जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येतात.

चाैकट-

जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत धोरण निश्चित केले होते. त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या केल्या जात होत्या. मात्र, शिक्षकांची संख्या व कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन सरकारने यात बदल केला आहे. आता अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या शिक्षकांचा विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ मध्ये समावेश केला आहे. पती-पत्नी एकत्रीकरणाचा संवर्ग-२ मध्ये समावेश आहे. सलग ५ अथवा १० वर्षे सेवा झालेले शिक्षकच नव्या धोरणात बदलीस पात्र ठरणार आहेत.

चौकट-

दुर्गम भागातील शाळांचे बदललेले निकष

दुर्गम भागातील शाळा नवीन निकषानुसार ठरवण्यात येणार आहेत. ७ पैकी ३ निकष पूर्ण करणाऱ्या शाळा दुर्गम भागामध्ये ठरवल्या जाणार आहेत. नक्षलग्रस्त क्षेत्रात असणारे गाव, २००० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडणारे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुटणारे गाव, वन्यप्राण्यांचा उपद्रव असलेले, वाहतूक सुविधांचा अभाव असलेले, डोंगरी भाग म्हणून जाहीर केलेले, राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून १० कि.मी.पेक्षा अधिक अंतर असलेले गाव अशा दोन वर्षांपूर्वी केलेल्या यादीमध्ये ९५० हून अधिक शाळा दुर्गममध्ये होत्या.

Web Title: This year too, inter-district transfer teachers will be suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.