यावर्षी रत्नागिरीत बाप्पांचा रस्ता अंधारात?

By Admin | Updated: September 1, 2015 21:02 IST2015-09-01T21:02:00+5:302015-09-01T21:02:00+5:30

एलईडी बासनात! : शेकडो पथदीप विझलेलेच

This year, the road of Ratnagiri in the dark? | यावर्षी रत्नागिरीत बाप्पांचा रस्ता अंधारात?

यावर्षी रत्नागिरीत बाप्पांचा रस्ता अंधारात?

रत्नागिरी : स्मार्ट सिटीसाठी केलेला प्रयत्न अपयशी ठरलेल्या रत्नागिरी पालिका क्षेत्रात पथदिव्यांखाली तर अंधार आहेच परंतुु पथदीपही अंधारात आहेत. साडेचार हजार पथदिव्यांपैकी निम्म्याहून अधिक पथदीप बंद आहेत. त्याजागी आता एलईडीही बसण्याची शक्यता मावळली आहे. बंद पडलेले पथदीप सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली पालिकेकडून होत नसल्याने शहरातील बाप्पाही अंधारातच राहणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. रत्नागिरी शहर एलईडीने झळाळून जाणार असल्याबाबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी घोषणा केली होती. त्यामुळे शहरवासीयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र, पथदीपांवर एलईडी बसविण्याच्या या योजनेसाठी बाजारभावापेक्षा अधिक दर निविदेत दाखवण्यात आला असून, बाजारात ही किंमत कमी आहे, असे निरीक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातून नोंदविण्यात आले. निविदेतील दर हे बाजारभावापेक्षा दुप्पट असल्याने पालिकेचे नुकसान करणे योग्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे एलईडीचा हा प्रकल्प बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता बळावली आहे. रत्नागिरी शहरात सध्या साडेचार हजार पथदीप आहेत. त्यामध्ये सोडीयम व्हेपर्सचे प्रमाण सर्वाधिक आहे. अलिकडे काही महत्त्वाचे चौक, उद्यानांजवळ हायमास्टही बसवण्यात आले आहेत. सोडियम व्हेपरच्या जागी एलईडी बसवण्यासाठी मध्यंतरी एका कंपनीने पालिकेशी संपर्क केला होता. त्यानुसार मुख्य मार्गावरील १५७ खांबांसह एलईडी बसविण्याबरोबरच अन्य खांबांवरील सोडीयम व्हेपरऐवजी एलईडी बसविण्याच्या या प्रकल्पाचा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पुरस्कार केला. मात्र, सभागृहात शिवसेनेने त्याला प्रथम विरोध केला. तसेच देकार न मागवता ही योजना राबवण्यास आपला विरोध असल्याचे निवेदन शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानंतर एलईडीकरिता देकार मागविण्यात आले. त्यानुसारही बाजारभावाच्या तुलनेत एलईडी बल्ब, खांब व अन्य साहित्य याचे दर अधिक असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. परिणामी एलईडीचे भवितव्य अंधकारमय झाले. जिल्हा प्रशासनाकडून या खर्चिक योजनेला मान्यता मिळण्याची शक्यता धुसर बनली आहे. कोणत्याही स्थितीत नागरिकांचे पैसे असे वाया जाता नये, हीच त्यामागची जिल्हा प्रशासनाची भूमिका असल्याचीही चर्चा आहे. या सर्व प्रकारात शहरवासीयांचे मात्र हाल झाले आहेत. शहराच्या अनेक प्रभागात मोठ्या प्रमाणात पथदीप बंद आहेत. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेतील गर्दी वाढू लागली आहे. सायंकाळनंतर बाजारपेठेत गर्दी असते. पथदीपांची अशावेळी गरज असते. आता एलईडीच जोडूया, असे तेथील लोकांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सांगितले जात आहे. परंतु एलईडी योजनाच अंधारात लोटली गेल्याने सोडियम व्हेपर कधी बसविणार, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. (प्रतिनिधी)

स्थायी समितीतही पथदीप ‘पेटले’...
गेले अनेक दिवस वेगवेगळ्या स्तरावर पेटणारे पथदीप आज (मंगळवारी) नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही पेटले. शहरातील अनेक पथदीप बंद आहेत. गणेशोत्सव तोंडावर आला आहे, शहरातील वर्दळ वाढली आहे. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ सुरू असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावरील गर्दी वाढली आहे. अशावेळी पथदीप बंद असतील तर आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे. गेल्या तीन महिन्यांपासून बंद पथदीपांचा प्रश्न ऐरणीवर आहे. सातत्याने त्यावर चर्चा सुरू आहे. एलईडीचा अजूनही पत्ता नाही. त्यामुळे बंद असलेले शेकडो पथदीप तरी तातडीने सुरू करावेत. तसेच शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून, हे खड्डेही गणेशोत्सवापूर्वी विशेष मोहीम काढून बुजविण्यात यावेत, अशी मागणी पालिकेतील सेनेचे नेते प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी केली. त्यानुसार कार्यवाहीचे आश्वासन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिले आहे.

Web Title: This year, the road of Ratnagiri in the dark?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.