यंदा हापूस येणार उशिरा
By Admin | Updated: October 10, 2015 23:50 IST2015-10-10T23:39:54+5:302015-10-10T23:50:33+5:30
अवकाळी पाऊस : उत्पादकतेवर होणार परिणाम

यंदा हापूस येणार उशिरा
रत्नागिरी :पावसाळा संपला असून, हिवाळा ऋतू सुरू होणार आहे. ऐन पावसाळ्यात ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. एकूणच संमिश्र हवामानामुळे यंदाचे भातपीक धोक्यात आले आहे. तापमान ३४ ते ५५ अंश सेल्सियस असले तरी हवेत ९० टक्क्यापर्यंत बाष्प असल्याने नागरिक हैराण होत आहेत. हवामान खात्याने येत्या २४ तासात पावसाचा इशारा दिला आहे. एकूणच या संमिश्र हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होणार आहे. एकूणच आंबा हंगाम लांबण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा तीव्र ऊन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत. परंतु, गेले दोन दिवस अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. आॅक्टोबर हीट सुरू होते, त्याचवेळी थंडीही सुरू होते.
यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे अद्याप किरकोळ स्वरूपात पालवी सुरू झाली आहे. पाऊस लागला तर पालवीसुध्दा वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून आंबा कलमांना पालवी सुरू होते. साधारणत: पालवी जुन होण्यासाठी ५५ ते ६० दिवस लागतात.
जून, जुलैमध्ये कलमांना खते घालण्यात येतात. याच दरम्यान लवकर फळे येण्यासाठी कल्टारचाही वापर केला जातो. परंतु, यावर्षी पावसाची वाट पाहत काही शेतकऱ्यांनी कल्टार वापरलेच नाही. त्याचप्रमाणे घातलेली खते अद्याप कलमांना लागू पडलेली नाहीत. पावसाअभावी झाडांच्या मूळापर्यंत खत पोहोचलेलेच नाही. तीच अवस्था कल्टारची देखील आहे. त्यामुळे यावर्षीच्या आंबा हंगामाबद्दल उत्सुकता लागली आहे.
पालवी कडक (जुन) झाल्याशिवाय मोहोर येत नाही. पावसाळा लांबला तर थंडी ऊशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. एकूणच आंबा हंगामाला ऊशीर होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्यामुळे थंडी कितपत पडेल याबाबत शंका आहे. ऐन पावसाळ्यात ऊन्हाळा अनुभवयास मिळाला आहे. गेले दोन दिवस हवामानात बदल झाला आहे. वारे वाहत आहेत. परंतु, शेतकरी देखील पाऊस पडून जाण्याची शक्यता वर्तवत आहेत.
गतवर्षी चांगल्याप्रकारे मोहोर आला होता, इतकेच नव्हे तर चांगल्याप्रकारे फळधारणा झाली होती. परंतु, फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे पीक वाया गेले. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाऊस पडण्याऐवजी आॅक्टोबरमध्ये पाऊस पडणे इष्ट ठरेल जेणेकरून आंब्याला पालवी येणे, पाला कडक होणे, मोहोर येण्याची प्रक्रिया सुरळीत होईल, असे बागायतदारांचा सूर दिसत आहे. (प्रतिनिधी)