यमाच्या काळ्या छायेलाच रोखले ‘माय’च्या ममतेने...!
By Admin | Updated: June 25, 2015 01:08 IST2015-06-25T01:06:03+5:302015-06-25T01:08:14+5:30
दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखम

यमाच्या काळ्या छायेलाच रोखले ‘माय’च्या ममतेने...!
शिवाजी गोरे, दापोली : ‘देव तारी त्याला कोण मारी?’असे म्हटले जाते. अगदी त्याचप्रमाणे दाभोळ टेमकरवाडीतील डोंगर कोसळून दरड कोसळली. त्या दरडीचा काही भाग हरेकर कुटुंबियांच्या घरावरील मागच्या बाजूला येऊन पडला. दरडीच्या रेट्यामुळे चक्क सागाचे झाड, ज्या खोलीत आई आपल्या मुलांना कुशीत घेऊन झोपली होती, त्याच खोलीवर येऊन पडले. मृत्यूची छाया त्यांच्यासमोर उभी होती. परंतु दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखम झाली व हर्षला हरेकर यांचे कुटुंब अक्षरश: बालंबाल बचावले.
हरेकर कुटुंबाचे दोन भावांचे एक घर आहे. त्या दिवशी दोन्ही कुटुंब आपापल्या मुलांना घेऊन आपल्या खोलीत झोपली होती. पुढे काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. त्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यावर दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासह झोपायला गेले. रात्रभर पावसाचा जोर कमीच होत नव्हता.
अचानक मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास डोंगर कोसळला व मोठ्याने आवाज होऊन दरड खाली आली. या दरडीत झाडे व घरे जमिनीत गाडली गेली. या डोंगराचा काही भाग हरेकर यांच्या घरावर येऊन धडकला. सागाचे एक मोठे झाड हरीश्चंद्र, हर्षला, सिद्धी, रिद्धी ज्या खोलीत साखरझोपेत होते, त्यांच्यावर येऊन पडले. डोंगराकडच्या भिंतीला भगदाड पडून दगड व झाडे खोलीत घुसले. परंतु, सुदैवाने चारहीजण बचावली. धो-धो पाऊस व त्यातच वीज नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोणाच्याही लक्षात येत नव्हता. हर्षला आपल्या मुलींसह साखर झोपेत होती. मात्र जेव्हा झाड पडले, तेव्हा रिद्धी आणि सिद्धी आईच्या कुशीत होत्या. त्यामुळे यमाची काळी सावली त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. हरिश्चंद्र यांच्या मोठ्या भावाने व शेजाऱ्याने खोलीत घुसून त्या सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली. अंधाऱ्या रात्रीत काळाने झडप घालण्याआधीच नातेवाईकाने खोलीतून ओढून बाहेर काढले. खोलीत झाड घुसल्याने बाहेर येता येत नव्हते. मृत्यू समोर उभा ठाकला होता. मात्र माय-लेकरांमधील अतूट मायेच्या धाग्यानेच जणू त्यांनी मृत्यूला थोपवून ठेवले आणि दोन मुलांचा पुनर्जन्मच झाला.