पुलाचे काम रखडल्याने संताप

By Admin | Updated: January 17, 2015 00:10 IST2015-01-16T22:15:59+5:302015-01-17T00:10:30+5:30

कोंड्ये-लावगणवाडी : बांधकाम खात्याकडे चौकशीची मागणी

Wrath of the bridge work | पुलाचे काम रखडल्याने संताप

पुलाचे काम रखडल्याने संताप

फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये -लावगणवाडी मुख्य रस्त्याच्या वहाळावरील पुलाच्या कामाला ठरलेला कालावधी उलटून गेला, तरी अद्याप संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. उपसरपंच दीपक शिंदे तसेच ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवरुख अधिकाऱ्यांकडे याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.संपर्क साधला असता उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने, संताप व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.मुख्य रस्त्यापासून गेलेला रस्ता आणि लावगणवाडी यामध्ये वहाळ असून, त्यावर पूल नसल्याने, येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. रस्त्यापासून घरे जवळ असूनही, दूरच्या मार्गाने रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे अन्य मार्गाने वळसा मारुन घरी जावे लागते. ही समस्या दूर होण्यासाठी, या वहाळावर पूल व्हावा, ही अनेक वर्षांची मागणी मान्य झाली. नाबार्ड योजनेंतर्गत २०१३मध्ये सुमारे २१ लाख रुपये मंजूर झाले. त्याचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवातही झाली.ठेकेदाराकडून सुरुवातीपासूनच कुर्मगतीने काम सुरु होते. पुलाचे काम अचानक ठप्प झाले, ते वर्ष उलटून गेले तरी अद्याप सुरु केलेले नाही. त्यामुळे हा पूल आजही पूर्णत्त्वाच्या प्रतीक्षेत असून, पाठ फिरवलेल्या ठेकेदारासह संबंधित विभागाचे अधिकारी न फिरकल्याने येथील लोकांच्या आशेला फुटलेली पालवी पार कोमेजून त्यांच्या नशिबी आजही तोच वनवास कायम आहे.याबाबत काम अर्धवट सोडून वर्ष उलटले. तसेच काम पूर्ण करुन देण्याचा शासनाचा कालावधीही संपला तरी अर्धवट काम जैसे थे असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरुख अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने येथील लोक संतप्त झाले आहेत. वरिष्ठ पातळीवरुन याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहेत.संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये येथील या पुलाचे काम रखडल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, रुग्ण यांचे हाल होत असून, ठेकेदारांनी मुदतीत काम पूर्ण न केल्याने त्याचा फटका गावाला बसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Wrath of the bridge work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.