रमार्इंच्या माहेराला जागतिक कीर्तीची नांदी
By Admin | Updated: August 31, 2015 21:28 IST2015-08-31T21:28:07+5:302015-08-31T21:28:07+5:30
भाई गिरकर : सामाजिक ऋण फेडण्यासाठीच वणंद गावदत्तक

रमार्इंच्या माहेराला जागतिक कीर्तीची नांदी
शिवाजी गोरे-- दापोली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामागे खंबीरपणे उभे राहून ज्या मातेने समाजासाठी सामाजिक योगदान दिले. अशा या महान कर्तृत्ववान माता रमाई आंबेडकरांचे वणंद हे माहेर आहे. या महान व्यक्तीमत्वाचे गाव आजही शासन दरबारी दुर्लक्षित आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करुन सामाजिक ऋण फेडण्यासाठीच वणंद गाव आमदार आदर्श ग्राम म्हणून आपण दत्तक घेतल्याचे माजी मंत्री आमदार भाई गिरकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
आमदार आदर्श ग्राम म्हणून वणंद गाव दत्तक घेतल्यानंतर पहिल्यांदाच भाई गिरकर वणंद येथे आले होते. माता रमार्इंचे माहेर वणंद येथे अलीकडे माता रमाई स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाईच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आज मी केवळ या महापुरुषांमुळेच मंत्री, आमदार होऊ शकलो. ज्यांनी शिका, संघटीत व्हा, प्रगती करा हा मूलमंत्र दिला. त्यामुळेच आज आपण घडलो. त्यांचे ऋण माझ्यावर आहेत. ते फेडण्यासाठीच वणंद गाव दत्तक घेतले आहे. या गावातील रस्ते, पाणी, २४ तास वीज, आरोग्य, शिक्षण, शौचालय, रोजगार या सुविधा पुरवण्यास आपण कटीबद्ध आहोत, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
माता रमार्र्इंचे गाव जगाच्या नकाशावर झळकण्यासाठी या गावात मुलींचे शासकीय वसतिगृह, कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या उच्च शिक्षणातून सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वणंद हे गाव दापोली शहरापासून जवळ असूनसुद्धा या गावाचा विकास झालेला नाही. हे महामानवाचे गाव दुर्लक्षित असल्याबद्दल खंत व्यक्त करुन माता रमाईचे माहेर जागतिक कीर्तीचे बनवण्याचा संकल्प केला असल्याचे आमदार गिरकर यावेळी म्हणाले.
वणंद गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गावाच्या नावलौकिकाला शोभेसे गाव बनवण्यासाठी वणंद-गिम्हवणे ग्रुप ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास केला जाईल. यामध्ये वणंद गावाची कामे प्राधान्याने केली जातील. वणंद बौद्धवाडी, गुजरवाडी, दुबळेवाडी, कांगणेवाडी, कातळवाडी, लोवरेवाडी, गवळवाडी या वाड्यातील कामे प्राधान्याने केली जातील, असेही ते म्हणाले.
आमदार आदर्श ग्राम योजनेची आमदार भाई गिरकर यांची ग्रामस्थांसमवेत माता रमाई स्मारकात बैठक झाली. या बैठकीत वणंद गावातील ७ वाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत वणंद गावाच्या आराखड्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला तहसीलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी डॉ. मनिषा देवगुणे, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस प्रीतम रुके, विस्तार अधिकारी भांड, शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे, सदाशिव रसाळ, मंगेश मोरे, शरद धोत्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम इदाते, सुभाष धोत्रे, सुनील धोत्रे, सुरेश धोत्रे, बाळाराम धोत्रे, चंद्रमणी गमरे, बाळाराम धोत्रे, चंद्रमणी गमरे, यशवंत काटकर, नारायण गुजर, अनंत गुजर, प्रकाश कांगणे, महिला बालकल्याण अधिकारी साळवी, धोंडू दुबळे, अर्चना येलवे, जि. प. सदस्या सुजाता तांबे उपस्थित होते.
सर्व योजना प्राधान्याने राबविणार
वणंद गावाचा सर्व्हे करुन गावाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होण्याचे दृष्टीने प्रयत्न केले जातील. शासनाच्या सर्व योजना या गावात प्राधान्य क्रमाने राबवण्यात येतील.
- कल्पना गोरे, तहसीलदार दापोली
गावाचा विकास आराखडा तयार झाल्यावर लोकसहभागातून गावाला विश्वासात घेऊन प्राधान्य क्रमाने विकासकामे केली जातील. आमदार आदर्श ग्रामसाठी जिल्हाधिकारी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करतील. ग्रामस्थांच्या सूचनांप्रमाणे गावातील विकासकामे केली जातील.
- डॉ. मनिषा देवगुणे, गटविकास अधिकारी
वणंद गाव आपण केवळ विकास कामाकरिता घेतले आहे. वणंद गावाच्या विकासात कोणतेही राजकारण आड येऊ देणार नाही. कोणीही यामध्ये राजकारण करु नये. माता रमाईच्या गावाचा विकास हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून गावाची निवड केली आहे.
- आमदार भाई गिरकर, माजी समाजकल्याणमंत्री