रहाटाघर येथील वीज उपकेंद्राचे काम रखडले
By Admin | Updated: October 2, 2014 00:28 IST2014-10-01T21:31:17+5:302014-10-02T00:28:29+5:30
महावितरण कंपनी : पावसामुळे उपकेंद्र परिसरात पाणी

रहाटाघर येथील वीज उपकेंद्राचे काम रखडले
रत्नागिरी : महावितरणच्या ३३/११ केव्ही रहाटाघर उपकेंद्राचे काम पावसामुळे रखडले आहे. उपकेंद्र परिसरात पाणी साठल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. भूमिगत वाहिनीचे कामकाज पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे उपकेंद्र सुरू होण्यास डिसेंबर उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रहाटाघर उपकेंद्र सुमारे पाच कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येत आहे. या उपकेंद्राची क्षमता १० मेगावॅट आहे. या ठिकाणी ५ मेगावॅटचे दोन ट्रान्स्फार्मर उभारण्यात येणार आहेत. ३३/११ केव्ही हार्बर उपकेंद्र व ३३/११ केव्ही कुवारबाव केंद्रांना हे उपकेंद्र जोडण्यात येणार आहे. शिवाय ३३/११ केव्ही पावस येथून येणारी भूमिगत वाहिनी या उपकेंद्राला जोडली जाणार आहे. कुवारबाव किंवा हार्बर वाहिनी बंद पडल्यास पावस वाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा देणे शक्य होणार आहे. या उपकेंद्रामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. भूमिगत वीज वाहिनी शहरात आणण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणने ३५ लाख रूपये नगरपालिकेकडे जमा केले आहेत. कोस्टल विभागातील भूमिगत वीजवाहिनीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर, गणपतीपुळे, गुहागर व मालवण येथे भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. फयान किंवा अन्य वादळ झाल्यास ओव्हरहेड वायर तुटण्याची भीती असते. पावसाळ्यात भूमिगत वाहिन्यांचे काम करता येत नाही. त्यामुळे संबंधित काम थांबविण्यात आले होते. डिसेंबरपर्यंत उपकेंद्र होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता एस. पी. नागटिळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)