सामंतांच्या कार्यालयावर प्रेरक धडकणार
By Admin | Updated: July 1, 2014 00:13 IST2014-07-01T00:10:43+5:302014-07-01T00:13:12+5:30
जाब विचारणार : रत्नागिरीत गुरुवारी करणार तीव्र आंदोलन

सामंतांच्या कार्यालयावर प्रेरक धडकणार
मार्लेश्वर : पाच जिल्ह्यात शिक्षण समृद्धी योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा निर्णय होवून ही योजनेच्या अमलबजावणीसाठीची प्रक्रिया पुढे सरकत नाही. याबाबत पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण समृद्धी प्रेरक संघटनेच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २ हजार प्रेरक पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील कार्यालयावर दि. ७ रोजी तीव्र आंदोलन छेडणार आहेत.
शासनाने निरंतर शिक्षण केंद्र योजना अचानक बंद केल्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सुमारे ७ हजार प्रेरकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यानंतर या पाच जिल्ह्यातील प्रेरकांनी शासनाविरोधात वारंवार आंदोलने केली. या आंदोलनामुळे या पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय तत्वत: मान्य करण्यात आला. तसेच योजनेची अमलबजावणी तातडीने करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतर हे आश्वासन पाळण्यात आलेले नाही, असे या प्रेरकांचे म्हणणे आहे.
याच काळात शिक्षण हक्काचा कायदा अस्तित्वात आला. यावेळी शिक्षण समृद्धी योजनेचा प्रस्ताव शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार द्यावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण समृद्धी प्रेरक संघटनेला दिल्या. यानुसार संघटनेने योजनेचा फेरप्रस्ताव शिक्षण मंत्रालयाला सादर केला. यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या संचालिका व्ही. राधा यांच्यासोबत या प्रस्तावावर चर्चाही झाली. या प्रस्तावावर निर्णायक बैठक घेवून त्याला अंतिम मान्यतेसाठी कॅबिनेटसमोर ठेवले जाईल, असेही ठरले.
मात्र अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही व योजनेची अंमलबजावणीसुद्धा झालेली नाही. त्यामुळे गेले चार वर्ष सातत्याने संघर्ष करणाऱ्या प्रेरकांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
आता सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यानुसार संघटनेचे राज्य निमंत्रक कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयावर जिल्ह्यातील शिक्षण प्रेरक मोठ्या संख्येने मोर्चा काढणार आहेत.
हा मोर्चा मारुती मंदिर ते जयस्तंभ असा निघणार आहे. सकाळी १०.३० वा. या मोर्चाला मारुती मंदिरपासून सुरुवात होणार आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय लिंगायत, श्रमिक मुक्ती दलाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र धावणे, उपाध्यक्ष उमेश कोलगे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते व संघटनेचे जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. (वार्ताहर)