आठ दिवसांत लांजा पंचायत समितीच्या कामाला सुरुवात : मानसी आंबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:39+5:302021-09-03T04:33:39+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : गेले सहा महिने कार्यालय स्थलांतरित करण्यात विलंब झाल्याने लांजा पंचायत समिती इमारतीच्या नवीन इमारतीचे ...

Work of Lanja Panchayat Samiti started in eight days: Mansi Ambekar | आठ दिवसांत लांजा पंचायत समितीच्या कामाला सुरुवात : मानसी आंबेकर

आठ दिवसांत लांजा पंचायत समितीच्या कामाला सुरुवात : मानसी आंबेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : गेले सहा महिने कार्यालय स्थलांतरित करण्यात विलंब झाल्याने लांजा पंचायत समिती इमारतीच्या नवीन इमारतीचे काम रखडले आहे. याबाबत ‘लाेकमत’ने प्रकाश टाकला असता प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या. या वृत्तानंतर गुरुवारी कार्यालय स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. येत्या आठ दिवसांमध्ये नूतन इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सभापती पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर यांनी दिली.

लांजा पंचायत समितीची इमारत अतिशय जुनी असून, ती जीर्ण झाली होती. त्यामुळे नूतन इमारतीसाठी लांजा पंचायत समितीकडून पाठपुरावा करण्यात आला होता. आमदार राजन साळवी यांनी खासदार, तसेच पालकमंत्री यांच्याकडे या इमारतीच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार लांजा पंचायत समितीच्या सुसज्ज नवीन इमारतीसाठी ३ कोटी ८० लाख रुपये इतका भरीव निधी प्राप्त झाला आहे. प्रत्यक्ष इमारत कामाला मार्च महिन्यामध्ये सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, पंचायत समिती खात्यांची कार्यालयासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने विलंब झाला होता. याबाबत ‘लाेकमत’मधून २ सप्टेंबर २०२१ राेजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले हाेते. या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

कार्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटल्याने गुरुवारपासून कार्यालये हलविण्याच्या कामाला सुरुवात केली. येत्या आठ दिवसांत नूतन इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर यांनी दिली आहे.

या इमारतीचा ठेका राधानगरी कोल्हापूर येथील अभय तेंडुलकर यांना देण्यात आला असून, इमारतीच्या बांधकामासाठी या ठिकाणी असलेली सर्व शासकीय कार्यालय ही अन्यत्र ठिकाणी हलविण्यास आली आहेत. त्यामध्ये शिक्षण विभाग हे लांजा शाळा नंबर ५ या ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच बांधकाम आणि पंचायत समिती सभापती उपसभापती ही दोन्ही कार्यालय पशुसंवर्धन इमारत या ठिकाणी हलविण्यात आली आहेत. तसेच सामान्य प्रशासन व लेखापरीक्षण विभाग व अन्य कार्यालय ही सांस्कृतिक भवनच्या पहिल्या मजल्यावर हलविण्यात आले आहेत. वर्षभरात हे नूतन इमारतीचे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास सभापती मानसी आंबेकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Work of Lanja Panchayat Samiti started in eight days: Mansi Ambekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.