लाकडी खोक्याचा पिंजरा झुकला नव्वदीकडे!
By Admin | Updated: January 28, 2015 00:53 IST2015-01-27T22:17:21+5:302015-01-28T00:53:46+5:30
महागाईचा परिणाम : बाजारपेठेत हापूस पोहोचण्यास महिन्याचा अवधी

लाकडी खोक्याचा पिंजरा झुकला नव्वदीकडे!
रत्नागिरी : आंबा बाजारपेठेत येण्यास सुमारे दीड महिन्याचा अवधी आहे. अजूनही कलमांवर फवारणी सुरू आहे. मात्र, आंबा बाजारपेठेत पाठविण्यासाठी लागणारा लाकडी खोका ‘पिंजरा’ तयार करण्यास आता प्रारंभ झाला आहे. मात्र, महागाईचा परिणाम या लाकडी खोक्यावरही झालेला दिसून येत आहे. तयार खोका ‘पिंजरा’ ९० रूपये दराने विकण्यात आहे, तर सुट्या पट्टीची ७५ रूपये दराने विक्री सुरू आहे.झाडावरून आंबा काढल्यानंतर त्याची वर्गवारी केली जाते. त्यानुसार तो गवताचा थर टाकून आंबा लाकडी खोक्यात बंद केला जातो. पट्टी निखळू नये, यासाठी हल्ली प्लास्टिक पट्टीदेखील क्लिपच्या सहाय्याने बसवली जाते. जेणेकरून ट्रक, टेम्पोतून पेट्यांची वाहतूक सुरक्षित होते.लाकूड तोडण्यासाठी वन खात्याचा परवाना आवश्यक आहे. त्यासाठी जंगली झाडे तोडून त्याचा वापर लाकडी खोक्यासाठी केला जातो, तर काही ठिकाणी जीर्ण झाडेदेखील तोडली जातात. सॉ मिलवर लाकूड कापण्यासाठी नेले जाते. त्याठिकाणी लाकूड कापण्यासाठी वेगळा दर द्यावा लागतो. एका खोक्याच्या पट्टीसाठी २० रूपयेप्रमाणे चिरकामाचे पैसे द्यावे लागतात.
काही शेतकरी खोक्याची सुटी पट्टी खरेदी करून खोका ठोकून घेतात. ही सुटी पटी एका खोक्यासाठी ७५ रूपये दराने विकण्यात येते. गतवर्षी सुटी पट्टी ६५ रूपये दराने विकण्यात येत होती.
विशिष्ट आकाराच्या पट्ट्या चुकांव्दारे जोडून खोका तयार केला जातो. चुका ७५ रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत, तर एक खोका ठोकण्यासाठी ५ रूपये दराने मजुरी द्यावी लागते. सुट्या पट्टीमध्ये मोडक्या किंवा तकलादू पट्ट्यांचा समावेश असल्याने त्यामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे तयार खोका खरेदी करणे परवडते. मात्र, रिकाम्या खोक्यासाठी ९० रूपये मोजावे लागतात. तर गतवर्षी तयार खोका ७५ रूपये दराने विकण्यात येत होता. सुरूवातीला हा दर कमी असला तरी ऐन हंगामात हे दर वाढतात.
एकूणच आंबा झाडावरून काढून मार्केटपर्यंत विक्रीला पाठविण्यासाठी प्रचंड खर्च येतो. झाडांना घातली जाणारी खते, फवारणीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके, फवारणीसाठी लागणारे इंधन, आंबा झाडावरून काढून त्याची वर्गवारी करणे, तद्नंतर पॅकिंग करून मार्केटमध्ये पाठवण्यासाठी येणारा वाहतूक खर्च, मजूरी, हमाली, दलाली आदी खर्च वजा जाता शिल्लक राहणारी बाकी शेतकऱ्यांची असते. त्यातच शेतकरी कराराने आंबा काढणीसाठी बागा घेत असेल तर तोही खर्च वजा करावा लागतो. (प्रतिनिधी)
आंबा बाजारपेठेत जाईपर्यंत अनेक खर्च होत असतात. वाढत्या महागाईचा परिणाम संबंधित बाबींवर दिसून येत असल्याने आंब्याला योग्य भाव मिळणे अपेक्षित आहे. त्या प्रमाणात दर का वाढू शकत नाही. आंब्याची विक्री किंवा मार्केटिंगवर दलालांचा ‘व्यापाऱ्यांचा’ प्रभाव असल्याने कोकणी शेतकरी गरीब राहिला आहे. एकूण आंब्याचे मार्केटिंग होण्यासाठी योग्य प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे.
- एम. एम. गुरव, शेतकरी