कायद्याच्या रखवालदाराकडेच लाकूडसाठा
By Admin | Updated: November 1, 2015 22:49 IST2015-11-01T22:49:33+5:302015-11-01T22:49:33+5:30
चाफवली गाव : चौकशीच्या आदेशानंतर अवैध लाकूडसाठा अन्यत्र हलवला

कायद्याच्या रखवालदाराकडेच लाकूडसाठा
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील पोलीसपाटलाच्या घराशेजारी तब्बल पाच महिने असलेला अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. रत्नागिरी - संगमेश्वरचे उपविभागीय अधिकारी यांनी देवरूख तहसीलदारांना याबाबत चौकशीचे आदेश देताच हा लाकूडसाठा काही दिवसांपूर्वी सलग तीन ते चार दिवस ट्रकद्वारे इतरत्र हलविण्यात आला आहे. मात्र, वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
चाफवली येथील पोलीसपाटील विजय चाळके यांच्याच घराशेजारी गेल्या पाच महिन्यांपासून सुमारे वीस ट्रक भरतील, एवढे लाकूड तोडून ठेवण्यात आले होते. चाफवली हे संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर झाले असतानाही एवढी लाकूडतोड होऊनही वन विभागाला त्याची खबरही नव्हती. याबाबत चाफवलीतील ग्रामस्थ दीपक दळवी यांनी देवरूख तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार दिली होती. देवरूख येथील वन अधिकारी यांच्याकडे तक्रारीचे रितसर निवेदनही देण्यात आल्यानंतर देवरूख वनपालांनी या जागेचा पंचनामाही केला होता. मात्र, याबाबतची पुढील कारवाई थंडावली होती. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी देवरूख तहसीलदारांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीचे आदेश मिळताच संबंधितांचे धाबे दणाणले. त्यामुळे या जागेवरील लाकूडसाठा तीन ते चार दिवसांत इतरत्र हलविण्यात आला आहे.
येथे असलेल्या लाकूडसाठ्याची दिवसाढवळ्या वाहतूक करताना वन विभागाचे डोळे बंद होते की काय, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधीत यंत्रणा पोलीसपाटलाला पाठीशी घालत असल्याचा आरोपही जनतेतून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)