खेडमध्ये लाकूड गिरणी आगीच्या भक्ष्यस्थानी
By Admin | Updated: June 17, 2014 01:17 IST2014-06-17T00:46:03+5:302014-06-17T01:17:35+5:30
५0 लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटने दुर्घटना

खेडमध्ये लाकूड गिरणी आगीच्या भक्ष्यस्थानी
खेड : खेड शहरातील साठे मोहल्ला येथील प्रथितयश व्यापारी लालूशेठ मुसा यांच्या मालकीच्या ख्वाजा सॉ मिलला काल, रविवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये सुमारे ५० लाखांचे लाकूड जळून खाक झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी मध्यरात्री नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आग आटोक्यात आली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे़
आग लागल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. खेड नगर परिषदेचा अग्निशमन बंबही लगेचच दाखल झाला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. अखेर लोटे एमआयडीसी आणि चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत मिलमधील लाकडे जळून खाक झाली होती.
मध्यरात्री शहरात आगीचे लोळ उठल्याने सगळ्यांचीच धावपळ उडाली होती. यामध्ये लाकडे कापण्याची पाच यंत्रे जळून खाक झाली आहेत. साग, आईन, आंबा आणि किंजळ अशी विविध प्रकारची किमती लाकडे जळून खाक झाल्याने ५० लाखांचे नुकसान झाले आहे. नगराध्यक्षा गौरी पुळेकर यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारीही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर दोन वाजता ही आग आटोक्यात आली.
या आगीचा पंचनामा तहसील कार्यालयाचे मंडल अधिकारी खेडेकर यांनी केला असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी धावती भेट दिली. (प्रतिनिधी)