चिपळूणचा कारभार अधिकाऱ्यांविना...
By Admin | Updated: October 2, 2014 22:24 IST2014-10-02T22:03:31+5:302014-10-02T22:24:22+5:30
रिक्त पदे कायम : कामांवर परिणाम--मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष.

चिपळूणचा कारभार अधिकाऱ्यांविना...
चिपळूण : शहरातील नगरपरिषदेचा कारभार अधिकाऱ्यांविना सुरु आहे. बांधकाम अभियंता, करवसुली अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आदी पदांवर अद्याप कोणाचीही नियुक्ती न झाल्याने नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. संबंधित प्रशासनाने रिक्त पदांवर आवश्यक त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी पदावर गेली अनेक वर्षे रामदास सावंत हे काम पाहात होते. दीड वर्षापूर्वीच त्यांची रत्नागिरी येथे बदली झाली. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्याचा कारभार काही दिवस आकाराम साळुंखे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर खेड येथून बदली झालेले मनोज शिरगावकर यांच्याकडे या पदाचा कारभार देण्यात आला. त्यांनाही या पदावरुन काही दिवसातच दूर करण्यात आले. या ठिकाणी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्या अधिकाराखाली आरोग्य निरीक्षक अनंत हळदे यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापूर्वी त्यांच्याकडूनही हे पद काढून घेण्यात आले असून, आरोग्य निरीक्षक म्हणून ते पुन्हा काम करु लागले आहेत. अंतर्गत राजकारणाचा परिणाम जनतेच्या कामांवर होत असल्याचा सूर ऐकू येत आहे.
रत्नागिरी येथून बांधकाम विभागामध्ये कर अधिकारी म्हणून एकनाथ ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली होती. १ वर्ष त्यांनी येथे काम केले. त्यांची बदली आता पुन्हा रत्नागिरी येथे झाली असल्याने या विभागातील हे पदही गेले काही दिवस रिक्त आहे. त्याचप्रमाणे बांधकाम अभियंता आत्माराम जाधव यांची अन्य ठिकाणी बदली झाल्याने या जागेवर भालचंद्र क्षीरसागर हे कामकाज पाहात होते. मात्र, गणेशोत्सवादरम्यान त्यांचीही बदली झाल्याने नगर परिषदेचा कारभार हा अधिकाऱ्यांविना चालला असल्याचे चित्र दिसून येत आहे. रत्नागिरी येथून पुन्हा चिपळूण बदली झालेले रामदास सावंत हेदेखील अद्याप कामावर रुजू झाले नसल्याने त्यांना पूर्वीचे पद देणार की अन्य पदावर सामावून घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
प्रशासनाचा कारभार ...
चिपळूण नगर परिषदेत प्रशासनाच्या अखत्यारीतील महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत. आरोग्य, आस्थापना, महसूल, पाणी या खात्यातील पदांबाबत वारंवार प्रश्न मांडण्यात आला. मात्र, ही पदे भरण्यात आली नाहीत. रत्नागिरीतून स्वगृही गेलेले रामदास सावंत यांच्याकडे कोणते खाते सोपवले जाणार याकडे नजरा लागल्या आहेत.
मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष.
बांधकाम अभियंता, करवसुली अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आदी पदे रिक्त.
सावंत अद्याप झाले नाहीत कामावर हजर.
पुन्हा अंतर्गत राजकारणाचा परिणाम.
जनतेच्या कामांवर परिणाम.