सेना-भाजपची माघार, कॉँग्रेसचे आंदोलन सुरूच

By Admin | Updated: March 9, 2016 01:23 IST2016-03-09T01:23:26+5:302016-03-09T01:23:43+5:30

कोकण आयुक्तांशी चर्चा : लेखी आश्वासनाची काँग्रेसची मागणी

The withdrawal of the army-BJP, the Congress's agitation continued | सेना-भाजपची माघार, कॉँग्रेसचे आंदोलन सुरूच

सेना-भाजपची माघार, कॉँग्रेसचे आंदोलन सुरूच

सिंधुदुर्गनगरी : कोकण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांमुळे सेना-भाजपच्या नेत्यांनी डंपर आंदोलन मागे घेतले आहे. जिल्ह्यातील ठप्प असलेला गौण खनिज व्यवसाय आज, बुधवारपासून सुरू होणार असल्याचे शिवसेना आमदार वैभव नाईक व भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. तर काँग्रेसप्रणित संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत आणि अशोक सावंत यांनी जाहीर केले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू झालेले डंपर आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे.
गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा मुख्यालयात डंपर चालक-मालक संघटनेचे जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात आंदोलन सुरूहोते. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जोपर्यंत लेखी स्वरूपात आपल्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान, आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्यामुळे या सर्वपक्षीय आंदोलनाची दिशा काँग्रेस विरूद्ध शिवसेना-भाजप अशी झाली होती. लाठीचार्ज झाल्या दिवसापासून सेना, भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्या संपर्कात होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी कोकणी विभागीय आयुक्त तानाजी सत्रे सिंधुदुर्गात दाखल झाले. यावेळी भाजप व सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.
यावर चर्चा होऊन वाळू वाहतुकीची वेळ १२ तासांवरून २४ तास करण्यात येईल. पूर्वीप्रमाणे पासचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, तसेच एक एक ब्रासचे पास द्यावेत व ते लगेच मिळावेत यासाठी पासची छपाई सिंधुदुर्गात करून घ्यावी. कागदपत्र नूतनीकरणाची वारंवार सक्ती करण्यात येऊ नये. शासकीय दरसूची (डी. एस. आर.) नुसार दंड आकारणी १ ते ५ पट करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील टेलिफोनचे विस्कळीत नेटवर्क पाहता एस. एम. एस. बाबत निर्णय घेण्यात येईल, असे सकारात्मक तोडगे काढण्यात आले. या सर्व चर्चेनंतर आम्ही समाधानी असून आंदोलन मागे घेत आहोत व उद्यापासून सर्व व्यावसायिक आपला व्यवसाय सुरू करतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी काका कुडाळकर, संजय पडते, अभय शिरसाट, संदेश पारकर, डंपर चालक-मालक उपस्थित होते.
कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्याशी अर्धा ते पाऊणतास सकारात्मक चर्चा झाली असली तरी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत डंपर चालक-मालक संघटनेचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी आग्रही भूमिका काँग्रेसप्रणित संघटनांनी घेतली आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे संदेश सावंत, अशोक सावंत यांनी संयुक्तपणे सांगितले.
तानाजी सत्रे यांच्याशी अर्धा ते पाऊणतास काँग्रेसच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यामध्ये रॉयल्टी, एस. एम. एस. सुविधा बंद करा, चुकीचा आकारलेला कोट्यवधीचा दंड परत करा व तीन ब्रासचे परवाने द्या अशा काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबे चिरे, वाळू, खडी व्यवसायांवर अवलंबून आहेत. म्हणून त्यांच्याबरोबर चोरासारखे न वागता सन्मानाने वागावे असे त्यांना सांगण्यात आले.
शासनाचा महसूल बुडू नये म्हणून व सरकारी कामांसाठी लागणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टीही जाऊ नये म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत. प्रशासनाने काहीजणांना ४० ते ५० लाख रुपयांचे दंड लावले आहेत. ते मागे घेण्यात यावेत व वाहतुकीच्यावेळी होणारा अवास्तव त्रास बंद करण्यात यावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. (प्रतिनिधी)

नीतेश राणेंवरील गुन्हे मागे घ्या
आमदार नीतेश राणे हे आमचे प्रश्न मांडण्यासाठी आले होते. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही अपमानास्पद आहे आणि त्यांच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. यावेळी मधुसूदन बांदिवडेकर, सभापती आत्माराम पालेकर, बाबा आंगणे, सुरेश सावंत, संदीप सावंत, डंपर चालक व मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The withdrawal of the army-BJP, the Congress's agitation continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.