‘रत्नागिरी गॅस’ची यंत्रणा धडधडणार?

By Admin | Updated: November 11, 2015 23:54 IST2015-11-11T20:43:55+5:302015-11-11T23:54:38+5:30

मुहूर्त लांंबला : मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात

Will Ratnagiri Gas Company Stumble? | ‘रत्नागिरी गॅस’ची यंत्रणा धडधडणार?

‘रत्नागिरी गॅस’ची यंत्रणा धडधडणार?


गुहागर : रत्नागिरी गॅस विद्युत प्रकल्पातील वीज घेण्यासाठी रेल्वेला आवश्यक सेंट्रल इलेक्ट्रिसीटी रेग्युलेट्री अ‍ॅथॉरिटीचा (सीईआरसी) परवाना मंजुरी मिळाली असली तरी अद्याप महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेट्री कमिशनची मंजूरी मिळणे अंतिम टप्प्यात आहे. या मंजुरीनंतर पुढील आठवड्यात वीजनिर्मिती सुरु होणे शक्य असल्याची माहिती कंपनीच्या अधिकृ त सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
रत्नागिरी गॅस प्रकल्पातून गेली दोन वर्षे गॅसअभावी वीजनिर्मिती बंद ठेवण्याची वेळ आली होती. सत्ता बदलानंतर सुरुवातीच्या काळात प्रकल्प सुरु करण्यासाठी अडचणी असल्याचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर आता हा प्रकल्प पुन्हा एकदा बंद केला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.
यानंतर केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांनी प्रकल्प सुरु होणार असल्याची प्रथम घोषणा केली. यानंतर १ नोव्हेंबरचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला होता. ‘गेल’ कंपनी नैसर्गिक गॅस पुरवठा करणार असून, रेल्वे रत्नागिरी गॅस प्रकल्पातून ५०० मेगावॅट वीज खरेदी करणार आहे. प्रकल्पाची जरी १९५० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असली तरी सध्या दोन ते तीन टप्प्यांतून १ हजार मेगावॅट वीजनिर्मितीची संपूर्ण सज्जता ठेवण्यात आली आहे. रेल्वेसाठी नव्याने वीज देताना अनेक तांत्रिक अडचणी होत्या.
यासाठी रेल्वेच्या दिल्ली येथील प्रमुख अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महिनाभरापूर्वी भेट दिल्यानंतर सकारात्मक अहवाल दिला होता. प्रकल्पातून रेल्वेला वीज घेण्यासाठी सेंट्रल इलेक्ट्रिसीटी रेग्युलेट्री अ‍ॅथॉरिटीची (सीईआरसी) महत्वाची मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक ते निकष पूर्ण करण्यात आले. नुकतीच याबाबत मंजुरी मिळाली आहे. असे असले तरी या प्रक्रियेतील दुसरा टप्पा असणारा महाराष्ट्र इलेक्ट्रिसीटी रेग्युलेट्री कमिशन (एम. ए. आर. सी.) चा परवाना मिळणेसाठी अंतिम टप्प्यात कामकाज आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभरात ही मंजूरी मिळून वीजनिर्मिती सुरु होणार आहे. त्यामुळे यापूर्वी असलेला १ नोव्हेंबरचा मुहुर्त थोडा लांबणीवर पडला अहे. (प्रतिनिधी)


सतराशे विघ्नं : पुढील आठवड्यात वीजनिर्मिती
रत्नागिरी गॅस कंपनीची सुरुवातीपासूनच अडथळ्यांची शर्यत सुरु होती. ती बंद पडल्यानंतर पुन्हा सुरु होणार की नाही? अशी शंका येण्याइतपत अडचणी वाढल्या होत्या.


मंजुरी मिळाल्यास.
महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेट्री कमिशनची मंजुरी मिळण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. ती मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात प्रकल्प सुरू होईल.

Web Title: Will Ratnagiri Gas Company Stumble?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.