मोदी लाटेचा प्रभाव तारणार की संपणार?

By Admin | Updated: September 18, 2014 23:22 IST2014-09-18T22:23:44+5:302014-09-18T23:22:29+5:30

उदय सामंत - बाळ माने तिसऱ्यांदा आमने - सामने येणार?

Will Modi end the impact of the waves? | मोदी लाटेचा प्रभाव तारणार की संपणार?

मोदी लाटेचा प्रभाव तारणार की संपणार?

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -गेल्या दोन टर्ममध्ये राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तीन महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीने राजकीय धुरिणांची गणिते सपशेल चुकविली आहेत. मोदी लाटेने महायुतीच्या पारड्यात पडलेले अधिक मतांचे वजन या विधानसभेतही तसेच राहणार की, त्यात बदल होणार, याबाबत जशी राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे, तशीच ती महायुतीच्या गोटातही आहे. त्यामुळेच या मतदारसंघात मोदी लाट थोपवत राष्ट्रवादी हॅट्ट्रिक साधणार की, मोदी लाटेने भाजपाला सुगीचे दिवस येणार? माने पराभवाची हॅट्ट्रिक तोडणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
येथील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २००९ मधील विधानसभा निवडणुकांचा असलेला ट्रेंड पूर्णत: बदलला आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची झलक तीन महिन्यांपूर्वीच पाहायला मिळाली. तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यात आता आणखी वाढ झाली आहे. मतदारसंघातील ९४ ग्रामपंचायतींपैकी ६८ ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात आहेत. कुवारबावसारखी महत्त्वाची ग्रामपंचायतही राष्ट्रवादीकडून हिसकावण्यात सेनेने यश मिळविले आहे. रत्नागिरी तालुक्यातील आठ व संगमेश्वर तालुक्यातील १ असे ९ जिल्हा परिषद गट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येतात, तर पंचायत समितीचे १७ गण मतदारसंघात आहेत.
गेल्या दशकापासून रत्नागिरी पंचायत समितीवरही युतीचा झेंडा आहे. जिल्हा परिषदही युतीच्याच ताब्यात आहे. असे असताना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मात्र गेल्या दोन टर्मपासून राष्ट्रवादीचा आमदार आहे. दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीच्या येथील आमदाराला राज्यमंत्रिपद मिळाले. या मतदारसंघाला हे मंत्रिपद तब्बल ५३ वर्षांनंतर मिळाले. मतदारसंघात सेना - भाजपचे प्राबल्य असतानाही आमदार विरोधी पक्षाचा असे चित्र कसे काय, याचाही अभ्यास केल्यानंतर पक्षसंघटनेतील काही प्रवाह विरोधकांना मदत करतात, असे सेना नेत्यांना आढळले. त्यातूनच झाडाझडती घेतल्यानंतर शिस्तीचे इंजेक्शन लोकसभा निवडणुकीत टोचण्यात आले, अन त्याचा जबरदस्त परिणाम दिसून आला.
सन २००९मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बाळ माने हे ८ हजार मतांनी पराभूत झाले होते. तीन महिन्यांपूर्वीचे जिल्हा परिषद गटनिहाय झालेले मतदान चक्रावून टाकणारे आहे. प्रत्येक गटात युतीला मोठे मताधिक्य आहे. नऊ गटातील मताधिक्य मिळून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीला ३२ हजारांचे मताधिक्य मिळाले. रत्नागिरी शहरातही मताधिक्य मिळाले. त्यामुळे हेच मताधिक्य विधानसभेतही मिळेल, या शक्यतेमुळे भाजपाचे बाळ माने हे सहज निवडूून येतील, असा महायुतीच्या नेत्यांचा अंदाज आहे. माने तयारी करीत असलेल्या मतदारसंघात त्यांना पक्षातच बाबा परुळेकर व दीपक पटवर्धन हे प्रतिस्पर्धी म्हणून समोर आले आहेत, तर या मतदारसंघात दोनदा पराभव झाल्याने भाजपाने हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र भाजपाचे बाळ माने यांना गेल्या निवडणूकीत तब्बल ६५ हजारांवर मते मिळाली होती हे विसरून चालणार नाही. तसेच यावेळी लोकसभेला असलेली मोदी लाट काही अंशी ओसरल्याचे बोलले जात असले तरी त्या लाटेचा लाभ होईल, असे भाजपला वाटते आहे.

...तर बंड्या साळवी रत्नागिरीतील उमेदवार!
राज्यात भाजप व सेनेत जागावाटपाचा तिढा कायम असताना रत्नागिरीतही सेनेच्या उमेदवाराबाबत चाचपणी घेण्यात आली आहे. सेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांचे नाव उमेदवारीसाठी सर्वप्रथम आहे. खासदार विनायक राऊत यांनी गेल्या दोन दिवसात त्यांच्याशी चारवेळा याबाबत संपर्क साधला आहे. तयारीत राहा, काहीही घडू शकते, उमेदवारी मिळू शकते, असे त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच साळवी हेसुध्दा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. रत्नागिरी मतदारसंघ सेनेला द्यावा, असा आग्रहही सेनेकडून सुरू आहे.

Web Title: Will Modi end the impact of the waves?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.