सभापती, उपसभापती बदलाचे वारे शमणार?

By Admin | Updated: December 3, 2015 23:46 IST2015-12-03T23:13:46+5:302015-12-03T23:46:58+5:30

राजापूर पंचायत समिती : पक्षीय बलाचा परिणाम

Will the chairperson, sub-party make a change? | सभापती, उपसभापती बदलाचे वारे शमणार?

सभापती, उपसभापती बदलाचे वारे शमणार?

राजापूर : राजापूर पंचायत समिती वर्तुळात सभापती व उपसभापती बदलाबाबत जोरदार वारे वाहत असले, तरी सत्ताधारी व विरोधक यातील समसमान बलाबल लक्षात घेता सेनेच्या वरिष्ठ स्तरावरुन या बदलाला आवश्यक प्रतिसाद मिळत नसल्याने पदाधिकारी बदलाचे वारे शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पुढील सव्वा वर्षासाठी व ऐन निवडणुकांच्या तोंडावर सभापती व उपसभापती बदलाचे फासे मागील वेळेप्रमाणे अनुकूल पडतील याबाबत भविष्य वर्तवणे महाकठीण बनल्यामुळे पंचायत समितीमधील पदाधिकारी बदलाची प्रक्रिया अजून मार्गी लागलेली नाही.राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे सहा, काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य आहेत. पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीने शिवसेनेला साथ देऊन सेनेला सभापतीपद देताना उपसभापतीपद आपल्या पदरात पाडून घेतले होते. मात्र, सभापतीपदाचे आरक्षण बदलताच राष्ट्रवादीने सेनेला दिलेला पाठिंबा मागे घेतला व काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकात सेना विरुद्ध काँग्रेस आघाडी यांचे समसमान म्हणजे प्रत्येकी सहा सदस्य निवडून आले. मतदानावेळी समान मतदान झाल्याने अखेर चिठ्यांचा प्रयोग करावा लागला होता. त्यामध्ये शिवसेनेचे दोन्ही पदाधिकारी विजयी झाले होते. त्यानुसार सभापती म्हणून सोनम बावकर तर उपसभापतीपदी उमेश पराडकर यांची निवड झाली होती. आता या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कालखंड पूर्ण झाला असल्याने पंचायत समिती वर्तुळात सभापती व उपसभापती बदलाचे वारे घोंगावू लागले आहेत. त्यासाठी सेनेतील इच्छुकांचा गट कार्यरत झाला असून, यावेळी बदल घडवायचाच असा निर्धार त्यांनी केला आहे. मात्र, सातवा सदस्य आपल्या गोटात आणा आणि त्यानंतरच आपण बदल घडवूया असा सबुराचा सल्ला सेनेच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
सातव्या सदस्य आपल्या गोटात आणण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तयारी चालू आहे. एक महिला सदस्य संपर्कात असल्याचे व निवडणुकीवेळी ती सदस्य अनुपस्थित राहिल याचे अभिवचन त्या महिला सदस्याच्या पतीकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचे संकेत मागील काही दिवसांत मिळत आहेत.
यासाठी ३ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये या विषयावर चर्चा होणार होती. सेनेचे संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार राजन साळवी बैठकीला उपस्थित राहणार होते. तथापि, काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
त्यामुळे आता ही बैठक पुन्हा केव्हा आयोजित केली जाईल व त्यावेळी पदाधिकारी बदलावर चर्चा होईल का याबाबत उत्सुकता आहे. तसेच आता राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याने आमदार राजन साळवी, नागपूरला रवाना होणार आहेत. त्यामुळे अधिवेशन समाप्तीपर्यंत तरी पदाधिकारी बदलाबाबतचा निर्णय होणे तूर्तास शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचे वारे शमले तर नाही ना, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)

देवाचे गोठणेला संधी? : सभापतीपद महिला मागास प्रवर्गासाठी
राजापूरचे सभापतीपद महिलांचा मागास प्रवर्ग या गटासाठी आरक्षित असून, शिवसेनेतर्फे सभापतीपदासाठी देवाचे गोठणे विभागाच्या पंचायत समिती सदस्या नलिनी शेलार व उपसभापतीपदासाठी साखरीनाटे गणाचे सदस्य दीपक नागले यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, यावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

अधिवेशन अडसर
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी आमदार राजन साळवी नागपूरला रवाना होणार आहेत. अधिवेशन संपेपर्यंत सभापती, उपसभापती निवड होणे शक्य नसल्याने अधिवेशनाचा अडसर या निवड प्रक्रियेला लागणार आहे.

Web Title: Will the chairperson, sub-party make a change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.