इमारतीचा प्रस्ताव बारगळणार?

By Admin | Updated: April 20, 2015 00:13 IST2015-04-19T21:30:30+5:302015-04-20T00:13:17+5:30

पंचायत समिती : चुकीच्या नोंदीबाबत महसूलकडून कार्यवाहीच नाही

Will the building proposal be revoked? | इमारतीचा प्रस्ताव बारगळणार?

इमारतीचा प्रस्ताव बारगळणार?

राजापूर : महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका आता सर्वसामान्यांबरोबरच राजापूर पंचायत समितीलाही बसत आहे. पंचायत समितीच्या मालकीच्या जागेच्या सातबारा सदरी झालेली चुकीची नोंद बदलून मिळण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर गेल्या दहा महिन्यात महसूल विभागाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याची बाब पुढे आली आहे. महसूल विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे राजापूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता आहे.
राजापूर पंचायत समितीच्या मालकीच्या सातबारा सदरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारी निवासस्थान अशी चुकीची नोंद झाली आहे. ती बदलून मिळावी, असा प्रस्ताव राजापूर पंचायत समितीने २४ जून २०१४ रोजी राजापूरच्या तहसीलदारांकडे सादर केला होता. मात्र, गेल्या दहा महिन्यांच्या काळात येथील तहसील कार्यालयाने यावर कोणतीच कार्यवाही केलेली दिसून येत नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला पंचायत समिती नवीन इमारतीचा प्रस्ताव पुन्हा एकदा शासनाच्या लाल फितीत अडकून पडला आहे.
राजापूर पंचायत समितीचे कार्यालय सध्या वापरत असलेली इमारत, पदाधिकाऱ्यांची कार्यालये, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने ही जागा पंचायत समितीच्या मालकीची आहेत. या जागेवर पंचायत समितीच्या अखत्यारीत असणारी सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे विचाराधिन आहे.
तसा आराखडा तयार करुन हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावासोबत पाठवण्यात आलेल्या जागेच्या सातबारा सदरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने अशी नोंद आहे. त्यामुळे शासनाकडून हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला आहे.
या सदरच्या जागेशी सार्वजनिक बांधकाम विभागाचा काहीही संबध नाही. ही जागा राजापूर पंचायत समितीच्या म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. असा खुलासाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदार, राजापूर यांच्याकडे पाठवलेला आहे.
मात्र, आता गटविकास अधिकारी, राजापूर यांनी चुकीची नोंद बदलून मिळण्यासाठी राजापूरच्या तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवला आहे. तब्बल दहा महिने झाले तरी हा पंचायत समितीचा प्रस्ताव तहसीलदार, राजापूर यांच्याकडे धूळ खात पडून आहे. त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. याचा फटका आता पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकाम प्रस्तावाला बसणार असून, यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यावर आता महसूल विभाग कोणती कार्यवाही करणार व दोषींवर कोणती कारवाई करत, याकडे राजापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)


पंचायत समित्यांच्या इमारती सुसज्ज करण्याबाबत गंभीर चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र नवीन इमारतीचा प्रस्ताव चुकीच्या नोंदीमुळे माघारी धाडण्यात आला असल्याने हे भिजत घोंगडे आहे.


राजापूर पंचायत समिती मालकीच्या सातबारावर सार्वजनिक बांधकाम अशी नोंद असल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागत आहे. दहा महिन्यात महसूल विभागाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही नाही. आता त्यामुळे इमारतीचा प्रस्तावच बारगळण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Will the building proposal be revoked?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.