चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून
By Admin | Updated: September 21, 2014 00:53 IST2014-09-21T00:52:58+5:302014-09-21T00:53:12+5:30
डोक्यात घातली लोखंडी पाईप : राजापूर तालुक्यातील कोंढेतड येथील घटना

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून
राजापूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून वृद्धाने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपचा प्रहार करून निर्घृण खून केल्याची घटना राजापूर शहरातील कोंढेतड भंडारवाडी येथे काल, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. सुनीता सखाराम पेडणेकर (वय ६०) असे वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आरोपी सखाराम नारायण पेडणेकर (६४) याला अटक केली आहे.
कोंढेतड भंडारवाडी येथील सखाराम पेडणेकर पत्नी सुनीता हिच्यासह राहत होता. सुनीता हिचे कोणाशीतरी अनैतिक संबंध असावेत, या संशयावरून दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत होती. शुक्रवारी नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला.यावेळी सखाराम याने तिला जवळच असणाऱ्या बांंबूच्या काठीने मारण्यास सुरुवात केली.
सखाराम याने काठीने प्रथम सुनीता हिच्या पायांवर मारहाण केली. काठी मोडल्यानंतर त्याने पंख्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी पाईप सुनीताच्या डोक्यावर मारली. यात ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी राजापूरचे पोलीसपाटील गंगाराम मनोहर पवार यांना तसेच राजापूर पोलिसांना ही घटना फोनवरून कळविली. राजापूरचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बाहेर अंगणात सुनीताचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. पोलिसी खाक्या दाखविताच सखारामने सर्व प्रकार सांगितला व खुनासाठी वापरलेला व लपवून ठेवलेला लोखंडी पाईप पोलिसांच्या ताब्यात दिला. यानंतर पोलिसांनी सखारामला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनीही घटनास्थळी लागलीच भेट दिली. राजापूरचे पोलीस निरीक्षक अशोक जांंभळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ओटणकर , हेड कॉस्टेबल एस. बी. नाईक, प्रकाश झोरे, आर. ए. गुरव , प्रसाद शिवलकर यांनी तपास केला. (प्रतिनिधी)
समजूत काढली अन् जिवावर बेतली...!
चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मृत सुनीताने १७ सप्टेंबरला राजापूर पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्रात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सखारामची समजूत काढण्यात आली होती; मात्र त्यानंतर फक्त तिसऱ्या दिवशीच सखारामने तिला संपविले आहे. या पावसाळ्यापूर्वी नव्यानेच बांधलेल्या घराला आतील दरवाजाची झडपे लावण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला व तो विकोपाला गेला होता.