कदम यांचा प्रवेश कोणाच्या पथ्यावर
By Admin | Updated: July 15, 2014 00:15 IST2014-07-15T00:09:43+5:302014-07-15T00:15:24+5:30
महत्त्वाची गणिते : आता चर्चा पुढील राजकारणाची

कदम यांचा प्रवेश कोणाच्या पथ्यावर
सुभाष कदम : चिपळूण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम याचा स्वगृही परतण्याचा निर्णय पक्का झाल्याने हा निर्णय नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे. कदम यांनी भास्कर जाधव यांना खुलेआम विरोध केला असल्याने सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यासाठी कदम यांचे पुनरागमन बेरजेचे झाले आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड झाल्यामुळे व अनेक तक्रारींची दखल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी न घेतल्यामुळे माजी आमदार कदम हे नाराज होते. जाधव आणि कदम यांचा हा वाद केवळ राजकीय नाही; तर तो व्यक्तिगत पातळीवरचा आहे. शिवशाहीचे सरकार आले असताना जाधव यांनी कदम यांच्या विविध चौकशा लावल्या होत्या. अनेक ठिकांनी दोघांनीही वैयक्तिक टोकाची टीका केली आहे. दुर्गेवाडी प्रकरण तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांचे विळ्या- भोपळ्याचे नाते जिल्ह्याला माहीत आहे. तरीही २००५ मध्ये कदम यांच्या शिफारशीमुळे जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश देण्यात आला.
भास्कर जाधव प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषद सदस्य, राज्यमंत्री, संपर्कमंत्री व प्रदेशाध्यक्ष झाले. पक्षाने त्यांना सातत्याने संधी दिली. याकाळात त्यांनी कदम समर्थकांवर अन्याय केला. नगरपरिषद निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभे केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरी केली. त्यांची तक्रार केली तर उलट राज्यमंत्रीपद गेल्यावर त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यामुळे कदम व त्यांचे समर्थक अधिक दुखावले. त्यांनी पक्षाचा त्याग केला व लोकसभा निवडणूक रायगडमधून लढवली.
प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड झाली आणि कदम यांना पक्षात परतण्याची संधी प्राप्त झाली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कदम यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यावर उपाय सुचवले व कदम यांना पक्षात सक्रिय होण्याचे आमंत्रण मिळाले. या बदल्यात प्रदेश सरचिटणीसपद, रत्नागिरी जिल्ह्याची निवडणुकीची जबाबदारी व विधान परिषदेची आमदारकी कदमांच्या पदरात पडणार आहे. अर्थात शेखर निकम यांना निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली असली तरी चिपळूण तालुक्यात कदम आणि भास्कर जाधव यांची ताकद समान आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचे कदम यांच्यावर सोपवले गेलेले काम सोपे नाही. त्यामुळे त्यांची कसोटी लागणार आहे.