‘ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी भगवंतांचे पाय’
By Admin | Updated: March 2, 2016 23:58 IST2016-03-02T22:40:33+5:302016-03-02T23:58:18+5:30
तुकाराम गोलमडे : जाकादेवीत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन, गोपालक मेळावा

‘ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी भगवंतांचे पाय’
रत्नागिरी : कृषीप्रधान भारत देशात दुग्ध उत्पादनाला चालना मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने गोपालन केले पाहिजे़ ‘ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी भगवंताचे पाय’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांनी केले. ते जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्यातील जाकादेवी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व गोपालक, शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते.
यावेळी पशुसंवर्धन समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद पुसावळे, पंचायत समिती सभापती बाबू म्हाप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ सुभाष म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी देसाई, दत्ता देसाई, दुग्ध उत्पादन सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ अभिजीत कसालकर, पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्यासह शेतकरी व गोपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
यावेळी गोलामडे म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भारत देशाने फार मोठा प्रगतीचा टप्पा ओलांडला आहे़ ही अभिमानाची गोष्ट असली तरी, आपला कोकण त्याबाबतीत फारच मागे राहिला आहे, अशी खंत व्यक्त करत त्यांनी प्रत्येक तालुक्यात पशु मेळाव्याचे आयोजन केले पाहिजे, असे सांगितले़ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, देश पुढे गेला. मात्र, कोकणात परिवर्तन घडलेले नाही़ दगड, खडी, वाळू याचे उत्खनन करून घर बांधायचे एवढेच काम कोकणातील माणूस करत राहिला़, असे गोलामडे यांनी सांगितले.
शेतीबरोबर पशुसंवर्धन महत्वाचे असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पुसावळे यांनी सांगितले़ या मेळाव्याला डेअरी मॅनेजर अनुपस्थित असल्याने अशोक जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
तर कोकणात सहकाराचा अभाव असून, शेतकऱ्यांना अर्थाजनासाठी, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पशु मेळाव्याचे आयोजन महत्वाचे असल्याचे मत सभापती बाबू म्हाप यांनी व्यक्त केले़ डॉ़ सुभाष म्हस्के यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली़ तर सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले. या मेळाव्यानिमित्त जिल्हाभरातून विविध जातीचे शेकडो गायी, म्हशी, बोकड, कोंबडे, शेळ्या, बैल इत्यादी पशुधन प्रदर्शनासाठी आणण्यात आले होते़ शेकडो शेतकरी, गोपालकांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता.
यावेळी आदर्श पशुपालक, कामधेनू दत्तक ग्राम योजनेचे अध्यक्ष, गुणवंत कर्मचारी, अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (शहर वार्ताहर)
येथील शेतकऱ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे़ दूध उत्पादनासाठी चिलिंग, पाश्चरायझिंग, प्लँट नाहीत, हे खरे असले तरी, येथील शेतकऱ्याकडे व्यावसायिकपणा नाही़ त्यामुळे मार्केटींगमध्ये तो कमी पडत आहे़, असे मत उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी व्यक्त केले़