कोण होणार जिल्हा परिषद अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:44+5:302021-03-22T04:27:44+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राेहन बने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी साेमवारी (२२ मार्च) ...

कोण होणार जिल्हा परिषद अध्यक्ष
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राेहन बने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी साेमवारी (२२ मार्च) निवडणूक हाेणार आहे. अध्यक्ष पदाच्या या शर्यतीत जिल्हा परिषद सदस्य उदय बने, विक्रांत जाधव, आण्णा कदम, बाळ जाधव यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, खरी चुरस उदय बने आणि विक्रांत जाधव यांच्यातच आहे. या दाेघांपैकी काेणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याची उत्सुकता आहे. सभापतीपदासाठीही साेमवारी निवडणूक हाेणार असून, चंद्रकांत मणचेकर, परशुराम कदम, पूजा नामे, स्वप्नाली पाटणे, रेश्मा झगडे यांना सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाच्या मुदतीप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांनी राजीनामे दिल्यानंतर सोमवारी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ३९, राष्ट्रवादीचे १५ आणि भाजप १ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, त्यामध्ये शिवसेनेचे १६ सदस्य जिल्हा नियोजन समितीत आहेत. उर्वरित २३ जणांना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीपदे मिळणार हे निश्चित होते.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदासाठी परशुराम कदम यांचे नाव निश्चित झाले आहे. लांजाचे चंद्रकांत मणचेकर यांच्या गळ्यात बांधकाम व आरोग्य सभापतीपदाची माळ घालण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे, तर पूजा नामे, स्वप्नाली पाटणे आणि रेश्मा झगडे यांचीही नावे सभापती पदासाठी आघाडीवर आहेत. त्यामध्ये महिला व बालकल्याण समिती आणि शिक्षण व अर्थ समिती या समित्यांची माळ नामे किंवा पाटणे यांच्या गळ्यात पडणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ सदस्य उदय बने, आण्णा कदम, बाळ जाधव आणि विक्रांत जाधव यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. यापैकी शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.