शहराच्या विद्रूपीकरणाला जबाबदार काेण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:31+5:302021-09-11T04:32:31+5:30
मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहरात जाहिराती असो वा शुभेच्छाफलक लावताना नगर परिषदेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. ...

शहराच्या विद्रूपीकरणाला जबाबदार काेण?
मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरात जाहिराती असो वा शुभेच्छाफलक लावताना नगर परिषदेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. जेलनाका, मारूतीमंदिर, साळवी स्टाॅप याठिकाणी होर्डिंग्स लावू नये अशी सूचना असतानाही फलकबाजी करून शहराच्या साैंदर्याला बाधा निर्माण करण्यात येत आहे. कार्यक्रम होऊन गेला तरी फलक हटविण्याची तसदी घेतली जात नाही.
विविध राजकीय पक्षांच्या जाहीरात वा अन्य फलकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कंपन्यांकडून जाहीरातीचे फलक लावताना नगरपरिषदेकडून परवानगी घेण्यात येत आहे. शहरातील मारूतीमंदिर, साळवी स्टाॅप, माळनाका, जेलरोड या ठिकाणी फलकांची गर्दी वाढत आहे.
नगरपरिषदेकडून नागरिकांना, वाहनचालकांना त्रास होणारे किंवा अनधिकृत फलक वेळोवेळी हटविण्यात येतात. अनधिकृत फलक लावणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येते. फलक लावताना सर्वसामान्य नागरिक, वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घेणे गरजेचे आहे. मात्र असे होत नसल्यानेच फलकांची गर्दी वाढते.
राजकीय पक्षांच्या कार्यक्रमावेळी तर फलकांची गर्दी प्रचंड वाढते. इतकेच नव्हे तर पक्षाचे झेंडेही पथदीपांच्या खांबांना लावले जातात. साळवीस्टाॅप ते बसस्थानकापर्यंतचा संपूर्ण मार्ग त्या-त्या पक्षांचे फलक, झेंडेमय झालेले असतात. त्यावेळी नागरिकांमधून कुतूहल नाही तर तीव्र नाराजी व्यक्त होत असते. कार्यक्रम झाल्यावरही फलक काढले जात नाहीत, तेव्हा नाराजीत आणखी भर पडते.
सूचनेकडे दुर्लक्ष
जेलरोड, माळनाका, मारूतीमंदिर, साळवी स्टाॅप याठिकाणी सूचनाफलक लावूनसुध्दा शुभेच्छाफलक लावले जातात. मारूतीमंदिर सर्कल परिसरात तर फलकांची इतकी गर्दी होते की, समोरचे वाहनही दिसत नाही.
कार्यक्रम संपला तरी फलक हटविले जात नाहीत.
वारंवार कारवाई
नगरपरिषदेकडून अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई सातत्याने सुरू असते.
वाहतुकीला व पादचाऱ्यांना त्रास होणारे फलक ताब्यात घेतले जातात.
नगरपरिषदेकडून कारवाई करूनसुध्दा फलकांची गर्दी कमी होण्याऐवजी वाढत आहे.
दंडात्मक कारवाई
कोणतेही फलक लावण्यापूर्वी नगर परिषदेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
अनधिकृत असलेले फलक नगरपरिषदेच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात येतात.
दंडात्मक कारवाई केली जाते. दंडाची रक्कम नागरी, सुविधा केंद्रात भरलेनंतर फलक ताब्यात दिले जातात.
कारवाई सुरूच
शहराच्या साैंदर्याला बाधा येऊ नये तसेच रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई नगरपरिषदेकडून केली जाते. फलक लावण्याची परवानगी देताना दिवसांची मर्यादा असते, तरीही फलक न हटवल्यास कारवाई केली जाते.
- निमेश नायर, आरोग्य सभापती,नगरपरिषद