खड्ड्यामुळे हाेणाऱ्या अपघाताला जबाबदार काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST2021-09-11T04:31:56+5:302021-09-11T04:31:56+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वेळंब फाटा येथे गेली दोन वर्षे मोठा खड्डा पडला ...

Who is responsible for the accident caused by the pit? | खड्ड्यामुळे हाेणाऱ्या अपघाताला जबाबदार काेण?

खड्ड्यामुळे हाेणाऱ्या अपघाताला जबाबदार काेण?

लाेकमत न्यूज नेटवर्क

असगोली : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वेळंब फाटा येथे गेली दोन वर्षे मोठा खड्डा पडला आहे. प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या खड्ड्याला आणि त्यामुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न भाजपचे गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांनी उपस्थित केला आहे.

सचिन ओक म्हणाले की, शृंगारतळी येथील एका शोरूमजवळ मोरी नसल्याने गेली दोन वर्षे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. पाणी साचून मोठा खड्डा तयार झाला आहे. यावर्षी हा खड्डा अधिक मोठा झाला आहे. वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने छोटे अपघात होत आहेत. गणेशोत्सवासाठी आलेल्या काही वाहनचालकांना पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहने पाण्यात आदळत आहेत. तरीही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

लोकप्रतिनिधींनी, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने या संदर्भात अनेकदा मागणी करूनही वेळंब फाट्यावरील हा खड्डा बुजवला का जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काही समस्या असतील तर त्या गणेशोत्सवापर्यंत बाजूला ठेवून या रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी शासन असमर्थ ठरल्याचे सचिन ओक यांनी सांगितले.

---------------

तिथे पूर्वी मोरी होती. या मोरीचे पाईप बदलण्याची आवश्यकता आहे. तेथून एक रस्ता शृंगारी मोहल्ल्याकडे जातो. त्या लोकांनी जागा देण्याची तयारी दर्शवून ५ ते ६ मीटर लांब नदीपर्यंत गटार बांधण्याची मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम यासाठी निधी नसल्याचे सांगत मोरीचे कामही करत नाही. याबाबत ग्रामपंचायतीने अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकामचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

- संजय पवार, सरपंच, पाटपन्हाळे ग्रामपंचायत

Web Title: Who is responsible for the accident caused by the pit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.