‘त्या’ अकरा गाळ्यांवर टाच कधी ?
By Admin | Updated: June 25, 2014 00:49 IST2014-06-25T00:47:48+5:302014-06-25T00:49:15+5:30
रत्नागिरी पालिका : थकीत भाडेवसुलीबाबत उदासिनता

‘त्या’ अकरा गाळ्यांवर टाच कधी ?
रत्नागिरी : तब्बल पावणेतीन कोटींचे भाडे थकीत असलेले रत्नागिरी नगरपालिकेचे छत्रपती शिवाजी क्रीडांगणातील ११ व्यापारी गाळे पालिकेने तत्काळ ताब्यात घ्यावेत, यासाठी रत्नागिरी पालिका पदाधिकारी आग्रही आहेत. मात्र, मालमत्ता विभागाकडून कारवाईबाबत सातत्याने चालढकल केली जात असल्याने मालमत्ता विभागाच्या कर्मचाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे. याप्रकरणी गाळ्यांचा ताबा पालिका घेणार की नाही? असे सवाल नागरिकांतून केले जात आहेत.
पालिकेच्या मालमत्ता विभागाने १५ दिवसांपूर्वी हे गाळे ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यावेळी बंदोबस्तामुळे पोलीस कुमक उपलब्ध नाही, असे सांगण्यात आल्याचे मालमत्ता विभागाचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतर हे गाळे ताब्यात घेण्यासाठी पुन्हा पोलिसांकडे मागणीच करण्यात आली नसल्याचे पुढे आले आहे. याबाबत आज काही नगरसेवकांनी मालमत्ता विभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर पोलिसांकडे बंदोबस्त मागितल्याचे थातूर-मातूर उत्तर देण्यात आले. या आठवड्यात पोलीस बंदोबस्ताची मागणी करणारे पत्र दाखवा, अशी मागणी करताच मालमत्ता विभागाचा संबंधित कर्मचारी त्या कार्यालयातून गायब झाल्याचे आढळून आले.
रत्नागिरी पालिकेच्या मालकीचे १७ गाळे छत्रपती शिवाजी क्रीडांगण, मारुती मंदिर येथे असून, त्यातील ११ गाळेधारकांनी १९९६ सालापासून आतापर्यंत गाळ्यांचे भाडेच भरलेले नाही. केवळ १, ९, १०, १६, १७ व १८ नंबरच्या गाळेधारकांनी नियमितपणे पालिकेचे भाडे भरले आहे. त्यामुळे २ कोटी ७८ लाख रुपयांची भाडे थकबाकीदार ११ गाळेधारकांवर कारवाई करावी, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)