बाळ मानेंचा पराभव कोणामुळे?

By Admin | Updated: October 20, 2014 22:29 IST2014-10-20T21:23:39+5:302014-10-20T22:29:57+5:30

जुन्या निवडणुकीची नवी चर्चा : शिवसेनेकडे एकगठ्ठा मते होती, मग ती जायची कुठे?

Who defeated the baby Manena? | बाळ मानेंचा पराभव कोणामुळे?

बाळ मानेंचा पराभव कोणामुळे?

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल ९३ हजारांवर मते मिळवून राष्ट्रवादीतून सेनेत गेलेले उदय सामंत यांचा दणदणीत विजय झाला. याचाच अर्थ रत्नागिरी मतदारसंघात गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेची ताकद मोठी आहे, हे निर्विवाद सत्य समोर आले आहे. शिवसेनेच्या याच बळावर युतीतर्फे याआधी दोनवेळा निवडणूक लढवताना बाळ माने यांचा विजयच व्हायला हवा होता. परंतु तसे घडले नाही. याचाच अर्थ मित्रपक्षात विरोधकांना मदत करणारी वेगळी ‘राजकीय शाखा’ कार्यरत होती. त्यामुळेच माने यांचा २००४ व २००९मध्ये पराभव झाला, असा निष्कर्ष राजकीय जाणकारांमधून काढला जात आहे.
गेल्या तीनही निवडणुकांत या दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी बोलकी आहे. २००४ मध्ये बाळ माने यांना युतीतर्फे लढल्यानंतर या मतदारसंघात ५७१८८ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले उदय सामंत यांना ६३,२३३ मते मिळून ते ६०४५ च्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माने यांना युतीतर्फे लढताना ६५९६९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीतून लढणाऱ्या उदय सामंत यांना त्यावेळी ७४,२४५ मते मिळाली होती.
८२७६ मतांनी सामंत विजयी झाले होते. खरेतर बाळ माने हे अत्यंत कमी मतांच्या फरकाने त्यावेळी पराभूत झाले होते. त्या दोन्ही वेळी मित्रपक्षातीलच एका गटाने हाराकिरी केल्याचा आरोप भाजपाच्या गोटातूनही झाला होता. झाले गेले विसरून माने यांनी पुन्हा निवडणूक लढविली.
दुसऱ्या वेळीही मित्रपक्षातील त्याच ‘शाखे’ने हाराकिरी केली. अन्यथा बाळ माने हे युतीचे (भाजपा) उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले असते, हाच निष्कर्ष नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील सेनेच्या मतदान आकडेवरून स्पष्ट होत आहे.
तीन महिन्यांपूर्वीच देशातील लोकसभा निवडणूक लढविली गेली. त्यावेळी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विनायक राऊत हे कॉँग्रेस उमेदवार नीलेश राणे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले. त्यावेळी पक्षातीलच हाराकिरी करणाऱ्या त्या ‘शाखे’च्या कार्यकर्त्यांवर राऊत यांनी चांगलाच औषधोपचार केला होता. त्यामुळेच राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ३१,५०० इतके मताधिक्य मिळाले होते.
ज्या मतदारसंघात बाळ माने सेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून उभे असताना केवळ ६ ते ८ हजारांनी पराभूत व्हायचे, त्याच मतदारसंघात लोकसभेला असा काय चमत्कार घडला की, हा अनुशेष भरून काढून वर राऊतांना ३१,५०० एवढे मताधिक्य मिळाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युती तुटली व मानेंचे ग्रह बिघडले.
राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या सामंत यांच्यासमोर त्यांनी भाजपच्या बळावर निवडणूक लढविली. त्यावेळी सेनेची मदत त्यांना होणार नाही, हे स्पष्ट होते. परंतु प्रत्येक पक्षाची ताकद यावेळी समजणार होती. या आकडेवारीवरूनच मागील दोन्ही निवडणुकीत काय झाले, याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकसभेला भाजपाने पूर्ण साथ दिल्याने विधानसभेत भाजपला मानेंच्या विजयाचे ‘गिफ्ट’ मिळेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात युती तुटल्याने भाजप व सेनेची मते किती, हे कळले. सेनेच्या ९३ हजार मतांमध्ये राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या सामंत समर्थकांची मतेही आहेत.
राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा यांनाही यावेळी १४ हजारांवर मते मिळाली आहेत. यावेळी माने यांना ५४ हजारांवर मते मिळाली, ही भाजपाची मते मानली आणि शिवसेनेला मिळालेल्या ९३ हजारांमधील राष्ट्रवादीची ४० हजार मते वजा केली, तरी उर्वरित ५० हजार मते मागील दोन निवडणुकांमध्ये गेली कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. मित्रपक्षातील त्या शाखेच्या हाराकिरीतूनच मानेंचा २००४ व २००९मध्ये दोन्हीवेळा पराभव झाला, हे स्पष्ट आणि स्वच्छ असल्याचा निष्कर्ष निघत आहे. त्यामुळेच यावेळी सेनेला मिळालेल्या मतांमुळे याआधीच्या दोन विधानसभा निवडणुकीतील निकालांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)

एका शाखेची करामत ?
सनबाळ मानेउदय सामंत
२००४५७१८८६३२३३
२००९ ६५९६९७४२४५ २०१४५४५४९९३,८७६

रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेची ताकद सिध्द.
मित्रपक्षात विरोधकांना मदत करणारी वेगळी ‘राजकीय शाखा’ होती कार्यरत ?
‘शाखे’च्या त्या कार्यकर्त्यांवर वेळीच उपचार केल्याने राऊत यांना मिळाले रत्नागिरीत मताधिक्य.

Web Title: Who defeated the baby Manena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.