रत्नागिरी पालिका कारभारावर अंकुश कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 23:42 IST2015-11-08T20:39:51+5:302015-11-08T23:42:08+5:30

विकासाबाबत भ्रमनिरास : सार्वत्रिक निवडणुकीत पडसाद उमटणार

Who is the controller of Ratnagiri municipality? | रत्नागिरी पालिका कारभारावर अंकुश कोणाचा?

रत्नागिरी पालिका कारभारावर अंकुश कोणाचा?

रत्नागिरी : शहरातील अनेक विकासकामे सत्तेत असलेल्या या सेना - भाजपमधील अंतर्गत वादामुळे अद्याप खोळंबलेली आहेत. पालिकेतील सेना - भाजपमधील कुरबुरींमुळे शहर विकासाबाबत जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे उघडपणे बोलले जात असून, त्याचे पडसाद २०१६मध्ये होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या कारभारावर नक्की अंकुश कोणाचा, सत्ता कोणाची, असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती असल्याचाही अनुभव नागरिकांना घ्यावा लागत असल्याची चर्चा आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेत चार वर्षांपूर्वी रत्नागिरीकरांनी मोठ्या विश्वासाने शहराची सत्ता सेना-भाजप युतीच्या हाती सोपवली. त्यानंतर अडीच वर्षांच्या काळात काही प्रमाणात तरी चांगला कारभार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर पालिकेत कोणाचा कोणाला पायपोस नाही, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेना व भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मैत्रीचे हात काढून घेतले. त्याचे पडसाद रत्नागिरी पालिकेतही उमटले. त्यामुळे आधीचे तोंडी ठरलेले करार कालबाह्य ठरवण्यात आले. त्यामुळे या-ना त्या कारणावरून सेना-भाजपमध्ये तू तू मै मै सुरू आहे. या विसंवादामुळे शहर विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.
शहर एलइडी दिव्यांनी झळाळून निघणार असल्याच्या घोषणेने रत्नागिरीकर भारावून गेले. मात्र, एलइडी प्रकल्पासाठी जास्त दराने निविदा स्वीकारण्यात आली असून, बाजारभाव कमी असल्याचा आक्षेप जिल्हा प्रशासनानेच घेतल्यानंतर हा प्रकल्प रखडला तो रखडलाच. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील ५० टक्के पथदीप बंद आहेत. त्याजागी एलइडी बसवले जाणार असल्याचे स्वप्न दाखवत सहा महिने गेले तरी साधे बल्बही लावले गेलेले नाहीत. गणेशोत्सवात काही बंद पथदीप सुरू करण्यात आले. दीवाळीतही शहरातील रस्त्यांवर नागरिकांना अंधारच पाहावा लागणार काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.
रत्नागिरी शहरात दररोज जमा होणारा २२ टन कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात टाकला जात आहे. या कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. येथे कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. घनकचरा प्रकल्प उभारून कचऱ्याची समस्या सोडवण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
शहरानजीकच असलेल्या दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. शहर वा एमआयडीसी परिसरात घनकचरा प्रकल्प उभारण्याबाबत केवळ चर्चाच होत आल्या. प्रत्यक्षात काहीच घडत नाही, अशी पालिकेबाबत रत्नागिरी शहरातील नागरिकांचीच तक्रार सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

समस्या अन आश्वासने...
शहराबाहेरील संकुलांना पाणी जोडणी देण्यासाठी पालिकेतीलच काहीजण आग्रह धरतात. मात्र, शहरातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक भागात कमी दाबाने पाणी येते, पाणीच येत नाही, अशा तक्रारी पालिकेत रोज घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यांना आश्वासनापलिकडे काहीच मिळत नाही, अशी चर्चाही शहरात आहे.

Web Title: Who is the controller of Ratnagiri municipality?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.