निराधार पुरुषाला जेव्हा कुटुंब सापडते...
By Admin | Updated: June 28, 2016 22:55 IST2016-06-28T22:54:53+5:302016-06-28T22:55:54+5:30
माहेर संस्थेने घेतला शोध : दोन महिन्यात उपचार करून सोडले घरी

निराधार पुरुषाला जेव्हा कुटुंब सापडते...
रत्नागिरी : ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे...’ असे म्हटले जाते. याचा प्रत्यय एका बंद चायनीज गाडीशेजारी विव्हळत असलेल्या एका पुरुषाला आला. त्याच्यावर उपचारच नव्हे; तर त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे काम ‘माहेर’ या संस्थेने केले आणि या पुरुषासाठी गेले काही दिवस विमनस्क असलेल्या कुटुंबात आनंदाचा पाऊस पडला.
जानेवारी २०१६मध्ये भाट्ये पुलाजवळ एक निराधार व्यक्ती वाईट अवस्थेत खूप दिवसापासून झोपली असल्याचा निनावी दूरध्वनी माहेर संस्था, रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांना आला. त्यांनी भाट्ये पुलाजवळ जाऊन पाहणी केली असता निराधार व्यक्ती एका बंद असलेल्या चायनीजच्या गाडीमध्ये झोपलेल्या अवस्थेत दिसली. त्यांच्या दोन्ही पायाला भल्या मोठ्या जखमा झाल्या होत्या व त्यांना चालता येत नव्हते. त्यांच्या अंगावर मळलेले कपडे होते. सुनील कांबळे यांनी त्यांची विचारपूस करता त्यानी आपले नाव दीपक जानूबक्षी फुंडे (गोंदिया) असे सांगितले. या निराधार व्यक्तीला औषधोपचार, निवारा, आहार व आसऱ्याची नितांत गरज ओळखून त्याला माहेर निराधार पुरुषांचट वृद्धाश्रम, हातखंबा, रत्नागिरी या संस्थेत दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार करण्यात आले. त्यांना खाणे, निवारा, आपुलकी, प्रेम मिळाल्याने त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली व पायाची जखमही तीन महिन्यात बरी झाली. ती व्यक्ती अर्थहिन बडबड करीत असल्याने शासकीय मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे उपचार चालू केले. अल्पावधीत दीपक फुंडे यांच्या मानसिक स्थितीत सुधारणा होऊ लागली. दोन महिन्यांनी त्यांची मानसिक स्थिती सुधारल्यावर आपल्या गावाचे नाव मु. पो. माल्ही, ता. आमगाव, जि. गोंदिया असे सांगितल्यावर माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी या पत्त्यावर पत्रव्यवहार केला.
तसेच आमगाव पोलीस ठाण्यालाही कळवण्यात आले. त्यांच्या मदतीने फुंडे यांच्या पत्नी पुष्पा फुंडे या खातरजमा करण्यासाठी रत्नागिरीत माहेर संस्थेत आल्या. दीपक फुंडे हे तिचे पती असल्याचे त्यांनी सांगितले. गेली ३ वर्षे ते मुलीच्या गावी जातो म्हणून बेपत्ता झाले होते. खूप शोध घेतला तरी ते सापडले नव्हते. त्यांची आशा आम्ही सोडून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फुलले आनंदाचे क्षण...
दीपक फुंडे यांना आपले नातेवाईक भेटल्याने खूप आनंद झाला होता. तसेच नातेवाईकांनाही दीपक जिवंत असल्याने व तो सापडल्याने समाधान वाटत होते. एका निराधार व्यक्तीला त्याचे हक्काचे घर मिळाल्याने माहेर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे, रुपाली कांबळे, चंद्रकांत शेंबडे, अमित चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.