सध्या काय महत्वाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:51+5:302021-06-30T04:20:51+5:30
दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य यंत्रणेची मूठभर माणसे तहान भूक विसरून रात्रंदिवस जागून कोरोनाशी लढा देत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून ...

सध्या काय महत्वाचे?
दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य यंत्रणेची मूठभर माणसे तहान भूक विसरून रात्रंदिवस जागून कोरोनाशी लढा देत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत आणायचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाची स्थितीही याहून काही वेगळी नाही. दिवस-रात्र शासनाकडून येणाऱ्या सततच्या नियमावलीची अंमलबजावणी करताना प्रशासनही मेटाकुटीस आले आहे. त्यातूनच नागरिकांच्या अनेक नाराजींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचेही अपुरे मनुष्यबळ, त्यातच एकाएकाच्या पाठीवर अनेक कामांचे ओझे त्यामुळे यंत्रणा थकलेली असूनही या महामारीच्या निवारणासाठी जीवाचे रान करत आहेत. हे करताना यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी हेही अखेरीस माणसेच आहेत, याचे भान आज प्रत्येक व्यक्तींने बाळगायला हवे. दीड वर्षांपासून कोरोनाशी लढा देताना यंत्रणा थकली आहे. त्यांना काय त्यांच्या कामाचे वेतन मिळते. असे आपण सहजपणे बोलत असलो तरीही सध्या हे अधिकारी, कर्मचारी आपण किती तास काम करत आहोत, याचा लेखाजाेखा न ठेवता अथक बारा ते अठरा तास काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेची अवस्था तर त्याहूनही अवघड आहे, हे डोळसपणे समजून घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तर आपण तिच्यावरून संपूर्ण यंत्रणेला दोष देतो आणि ते करत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो. मात्र, यातही राजकारण अधिक असते. सध्या रत्नागिरीत विविध पक्ष तापल्या तव्यावर पोळी भाजण्यापलीकडे काहीही करत नाहीत. कोरोनाच्या संकटात होरपळेतोय तो सामान्य माणूस. प्रशासनालाच केवळ दोष देण्यापलीकडे आणि त्यातील केवळ चुकाच दाखविण्यापलिकडे फारसं काही केलं जात नाही. चुका असतील तर दाखवायलाच हव्यात, पण त्यासाठीही काळ वेळेचे भानही हवेच. आम्हाला लोकांचा किती पुळका, हे केवळ दाखविण्यासाठीच अट्टाहास दिसतो. मात्र, एकत्र येऊन कोरोनाचा लढा देऊया, असे कुणालाच वाटत नाही ही शोकांतिका आहे. म्हणूनच सध्या परिस्थिती गंभीर होत आहे.
यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ते विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक. राजकारणापलीकडे आणि प्रसिद्धीच्याही पलीकडे जाऊनही ते खऱ्या तळमळीने काम करत आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाशी अथवा राजकारणाशी काहीही देणं नाही म्हणूनच हे स्वयंसेवक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूत ठरत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण, औषधांचे सहकार्य करण्यापासून तर काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक पुढे आले नाहीत तर त्याच्या अंत्यसंस्कारांसाठीही पुढे येत आहे. विविध पक्षांनी यातून काही तरी शिकावं. राजकारणापेक्षा व्यक्तींचे जीव महत्त्वाचे नाहीत का?