मुलांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न असल्याने निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र भविष्यात मुलांच्या करिअरवर परिणाम होण्याचा धोका आहे. परीक्षा न घेता मुले पास करण्याच्या निर्णयामुळे मुलांमध्ये, पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी हे क्षणिक आहे. परीक्षा न घेण्यामुळे मुलांच्या लेखनावर परिणाम झाला असून, सराव कमी झाला आहे. शिवाय वाचन, आकलन करून पेपर सोडविण्याची पद्धत बंद पडू लागली आहे. गेल्या वर्षापासून परीक्षा रद्द करण्यात येत असल्याने दोन वर्षे विनाकष्ट, मुलांना सहज एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाता येत आहे.
विद्यापीठांनीही बहुपर्यायी पद्धतीने उन्हाळी परीक्षेचे नियोजन केले आहे. गतवर्षी रुग्णवाढीमुळे जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र ऑनलाइन सुरू होते. वेळेची मर्यादा असल्याने अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. नोव्हेंबरपासून पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मात्र पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन सुरू होते. शासनाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अभ्यासात हुशार असणारे, होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा एक महिना लांबणीवर गेल्या आहेत. परीक्षा लांबणीवर टाकल्याने मुलांचे नुकसान होत आहे. परीक्षा पुढे ढकलून वेळ मारली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. आता विद्यार्थी, पालकांचे लक्ष राज्य शासनाच्या बोर्डकडे लागले आहे. परीक्षा रद्द करण्याऐवजी जर शाळा पातळीवर परीक्षा घेता येतील का? मुलांच्या, शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत प्रश्न असल्यामुळे याबाबत काही नियोजन होणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर काही प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मुलांना सहज पास होण्याची सवय लागली तर मात्र अभ्यासाकडील कल कमी होणार आहे. किंबहुना आधीच कमी झाला आहे. कोरोनामुळे मुले घरात असल्याने मोबाइलकडे ओढा वाढला आहे. पालकांनी किती सांगितले तरी मोबाइलकडेच मुले अधिक आकृष्ट होत आहेत. चिडखोर, हट्टी, दंगेखोर झाल्याची तक्रार पालक करू लागले आहेत. काही जागरूक पालकच मुलांना मोबाइलपासून बाजूला ठेवून दररोज काही वेळ वाचन, व्यायाम, बैठे खेळ घेत आहेत. एकूणच मुलांचे लक्ष मोबाइलपासून दूर करण्याकरिता पालकांनी जागरूक होत घरापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. परीक्षा रद्द करण्यापेक्षा त्यातून काही मार्ग काढता येईल का, याबाबत विचार करावा. जेणेकरून मुलांच्या भविष्यात कुठेही अडसर निर्माण होणार नाही.