राणे पिता-पुत्रांनी मच्छीमारांसाठी काय केले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:57 IST2017-07-22T17:57:07+5:302017-07-22T17:57:07+5:30
दामोदर तांडेल यांचा आरोप

राणे पिता-पुत्रांनी मच्छीमारांसाठी काय केले ?
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. २२ : अनेक वर्षे सत्तेत असताना व एकवेळा मुख्यमंत्री असतानाही कॉँग्रेस नेते नारायण राणे यांनी मच्छीमारांसाठी कोणतीही योजना राबवली नाही. खासदार असताना नीलेश राणेंना मच्छीमारांसाठी केंद्राच्या योजनेतून निधी आणता आला नाही. आमदार नीतेश राणे यांना मच्छीमारांचा आताच पुळका का आला? अधिकाऱ्यांवर मासे फेकणे, ही निव्वळ स्टंटबाजी आहे, असा हल्लाबोल अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी येथे केला.
सागरी मच्छीमार संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त येथील खारवी समाज भवनात आयोजित मच्छीमार मेळाव्यात तांडेल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो, समितीचे मुंबई जिल्हाध्यक्ष दिगंबर वैती, ठाणे जिल्हाध्यक्ष माल्कम कासेकर, सागरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर लोकरे, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, सचिव सुधीर वासावे, खजिनदार मुश्ताक मुकादम, समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष खलील वस्ता, भगवान खडपे, जिल्हा उद्योग केंद्राचे विजय पवार, संजय पावसकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तांडेल म्हणाले, परप्रांतीय नौका, पर्ससीन नौकांच्या विरोधात नीतेश राणे यांनी आंदोलन केले, याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, हे त्यांना आताच का सुचले. याआधी का सुचले नाही, त्यांनी मच्छीमारांच्या बाजूने आधीपासून हा प्रामाणिकपणा का दाखवला नाही, असे सवाल करीत राणे पिता - पुत्रांनी मच्छीमारांसाठी आजवर काहीही केलेले नाही. मच्छीमारांनी आपल्यामागे यावे, यासाठीच आता उमाळा आला आहे, असा टोला तांडेल यांनी लगावला.
यावेळी नौका दुरुस्तीच्या अभ्यासक्रमाबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी विजय पवार यांनी माहिती दिली. सागरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर लोकरे म्हणाले, मच्छीमार खलाशांना नौकामालकांनी करारपत्र करून दिले पाहिजे. यावेळी पर्ससीन व पारंपरिक मच्छीमारीचा विषय योग्यरित्या हाताळायला हवा, असे मुश्ताक मुकादम म्हणाले. प्रदूषणकारी प्रकल्पांच्या सांडपाण्यामुळे मत्स्यजीवन धोक्यात आले आहे, असे सुधीर वासावे म्हणाले. कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो म्हणाले, कामगारांना निवृत्तिवेतन मिळते. सरकार व संघटनेच्या माध्यमातून मच्छीमारांना निवृत्तिवेतन देता येईल.