पश्चिम घाट जंगलपेर अभियान २९ पासून
By Admin | Updated: November 27, 2015 00:14 IST2015-11-26T21:13:36+5:302015-11-27T00:14:52+5:30
पत्रकार परिषदेत माहिती : ग्लोबल वॉर्मिंग प्रश्न सोडवण्यासाठी इर्जिक जंगलपेर चळवळ

पश्चिम घाट जंगलपेर अभियान २९ पासून
चिपळूण : निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ, महाराष्ट्र व कोकण एक्स्प्रेस फाऊंडेशनतर्फे रविवार दि. २९ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून येथील महेंद्रगिरी पर्वतात (परशुराम घाटात) बिगरमोसमी पश्चिम घाट जंगलपेर सुरु करण्यात येणार आहे. याची सुरुवात सकाळी ९ वाजता पेढे येथे होणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.
पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांना देशातील तमाम पर्यावरण प्रेमींतर्फे आणि इर्जिक जंगलपेर अभियानाच्या पुढाकाराने (ग्रीन मार्शल आॅफ वेस्टर्न घाट) अशी मानवंदना देण्यात येणार आहे. जगाला सतावणारा ग्लोबल वॉर्मिंग प्रश्न सामान्यांच्या व्यापक सहभागातून सोडवण्यासाठी इर्जिक जंगलपेर चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीचे रुपांतर पुढे जावून ‘गांधीजी अगेंस्ट ग्लोबल वॉर्मिंग’ असे करण्यात येणार आहे. दि. २९ रोजी चिपळूण येथील परशुराम घाटात पश्चिम घाट इर्जिक जंगलपेर सुरु करण्यात येणार आहे. या पहिल्या मोहीमेत रानटी वनस्पतींच्या एक कोटी बिया गांधीजींची काठी व बटवा यांच्या मदतीने पेरण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक व कोकण एक्स्प्रेस फाऊंडेशनचे सतीश कदम यांनी दिली.
पर्यावरण वृध्दी व संरक्षण आणि वाढत्या ग्लोबल वॉर्मिंग विरोधात लढा देण्यासाठी देशभर व आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षणाची चळवळ वाढवण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध बिगरमोसमी वनस्पतींच्या बिया पेरण्यात येणार आहेत. पुढील महिन्यात पॅरिसला आंतरराष्ट्रीय ग्लोबल वॉर्मिंग परिषद होत असून, या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरण विषयक संवेदना निर्माण व्हावी हाच या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी समितीचे धीरज वाटेकर, मकरंद भागवत, राजेंद्रकुमार शिंदे, अनिल घाग, समीर कोवळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोकणात विशेषत: जिल्ह्यात पर्यावरण रक्षणासाठी अशा पद्धतीचा हा पहिलाच उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या महत्त्वाच्या चळवळीत जनतेचा सहभाग अपेक्षीत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पर्यावरणप्रेमी अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अॅड. कारभारी गवळी - पिपल्स हेल्पलाईन, अशोक सब्बन - भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, अॅड. लक्ष्मण पोकळे अहमदनगर, ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते बलभीम डोके, वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचा समावेश असणार आहे.