दरवाढीने केले श्रावणाचे स्वागत
By Admin | Updated: July 27, 2014 23:03 IST2014-07-27T22:36:32+5:302014-07-27T23:03:27+5:30
टॉमेटोचे दर हाताबाहेर : शाकाहार पाळण्याचा ‘धर्म’ खिशाला चाट देणार

दरवाढीने केले श्रावणाचे स्वागत
रत्नागिरी : श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांचे दर वधारले आहेत. ६० ते १२० रूपये किलो दराने भाज्यांची विक्री होत असल्याने यंदा श्रावणात शाकाहार पाळणे म्हणजे खिशाला चाट देणारे ठरणार आहे.
श्रावण महिना व्रतवैकल्याचा असून, हिंदू भाविक महिनाभर शाकाहार अवलंबतात. बहुतांश मंडळी उपवास करीत असतात. परंतु भाज्यांचे दर वधारल्यामुळे चार ते सहा माणसांच्या कुटुंबात भाज्या काय पुरविणार, असा प्रश्न गृहिणींना पडू लागला आहे. दररोजच्या जेवणात आवश्यक असणाऱ्या टोमॅटोच्या दराने चांगलीच उचल खाल्ली आहे. ८० ते १०० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे. शिवाय टोमॅटोची प्रतही चांगली नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत.
आल्याच्या दरानेही मात्र उच्चांक गाठला आहे. १५० ते २०० रूपये किलो दराने आल्याची विक्री सुरू आहे. त्यामुळे जेवणात हिरवा मसाला वापरण्यापूर्वीच ठसका लागण्याची वेळ आली आहे. मिरची ८० ते १०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे. एरव्ही पाच रूपयांना मिळणारी पुदीनाची जुडी ३० रूपये दराने विकण्यात येत आहे. किरकोळ विक्रेत्यांकडील पुदीना गायब झाला आहे. लसूणसुध्दा ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे.
सर्वसामान्यांना परवडणारी वांगी ३० ते ४० रूपयांच्या घरात आहेत. दूधी ३० रूपये, कोबी ४० रूपये, तर फ्लॉवर ५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. सर्व भाज्यांचे दर २५ ते ३० रूपयांच्या घरात स्थिर होते. मात्र, आता तेही वधारले आहेत. गेल्या आठवड्यात फरसबी ८० रूपये किलो दराने विकण्यात येत होती. मात्र, त्यामध्ये घसरण झाली असून, ६० रूपये दराने विकण्यात येत आहे. सिमला मिरची, घेवडा, पावटा ६० रूपये प्रतिकिलो दराने विकण्यात येत आहे. दोडकी, भेंडी, गाजर ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. पावकिलो भाज्यांसाठी २० ते २५ रूपये मोजावे लागत आहेत. बाजारात रानभाज्यांबरोबर गावठी पालेभाज्यांही उपलब्ध आहेत. माठ, मेथी, पालक, मूळा, शेपू आदी भाज्यांच्या जुड्या १० ते १५ रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहेत.
कांदा २५ ते ३० रूपये किलो, तर बटाटा ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. काकडी, बीट ३५ ते ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान संपत आला असून, ईद तोंडावर आली आहे. ईदसाठी हिरवा मसाला, टोमॅटो कांदा, बटाटा, काकडी, गाजर, बीट, लिंबूला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, दरामुळे ग्राहक हैराण होत आहेत.(प्रतिनिधी)