वेतन पथकाचा भार चौघांवर !

By Admin | Updated: July 9, 2015 00:06 IST2015-07-09T00:06:32+5:302015-07-09T00:06:32+5:30

अनंत अडचणी : अतिरिक्त कामाचा ताण

Weighing the wages of four teams! | वेतन पथकाचा भार चौघांवर !

वेतन पथकाचा भार चौघांवर !

आनंद त्रिपाठी -वाटूळ -रत्नागिरी जिल्ह्यातील ३८० अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ६ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी तसेच भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या अद्ययावत करणे तसेच निवृत्तिवेतन आदी महत्त्वपूर्ण व आर्थिक कामांची जबाबदारी असणाऱ्या जिल्हा वेतन पथक कार्यालयाचा भार फक्त चार लिपिकांवरच आहे.
सन २०१२नंतर पूर्णवेळ वेतन अधीक्षकदेखील कार्यालयाला उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एक वेतन अधीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी तसेच चार लिपिकांची गेल्या कित्येक महिन्यांपासून उणीव असल्याने कामाचा भार फक्त चार कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीच्या पावत्यांचे महत्त्वाचे काम खूप मागे पडले असून, ३८० शाळांमधील ६ हजारांवर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कामे करताना चार लिपीकांच्या नाकीनऊ येत आहेत.
जुलै महिन्याची वेतनवाढ, महागाई भत्त्याचा फरक आदी गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांना रात्री ८ वाजेपर्यंत कामे करावी लागत आहेत. वेतन वेळेवर व्हावे, यासाठी सुटीच्या दिवशीही हे कर्मचारी कामे करीत आहेत. जिल्हा वेतन पथकाला कर्मचारी देण्याचे काम शिक्षण संचालकांचे आहे. वारंवार पाठपुरावा करुनही रत्नागिरी जिल्ह्यासाठी वेतन अधीक्षक व सहाय्यक लेखाधिकारी मिळत नसल्याची खंत शिक्षण संघटनांकडून व्यक्त होत आहे. या रिक्त पदांवर लवकरात लवकर पदभरती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


मे महिन्यात कोल्हापूर येथे झालेल्या उपसंचालकांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला असून, लवकरात लवकर जिल्ह्यासाठी वेतन अधीक्षक तसेच लिपिकांची रिक्त पदे भरली न गेल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरेल. गेले अनेक महिने रिक्त पदांच्या प्रश्नी शिक्षक परिषदेने संबंधितांचे लक्ष वेधलेले आहे. मात्र, अद्याप त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.
- रमेश जाधव, अध्यक्ष,
शिक्षक परिषद, रत्नागिरी जिल्हा.

Web Title: Weighing the wages of four teams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.