कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लग्न सोहळे कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:41+5:302021-05-25T04:35:41+5:30
राजापूर : गेले काही दिवस राजापूर तालुक्यातील पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असतानाच तालुक्याच्या काही ठिकाणी झालेल्या ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लग्न सोहळे कारणीभूत
राजापूर : गेले काही दिवस राजापूर तालुक्यातील पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असतानाच तालुक्याच्या काही ठिकाणी झालेल्या विवाह सोहळ्यातूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचे पुढे आले आहे़ त्यामुळे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत़ सोमवारी दुपारपर्यंत तालुक्यात ६७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. विवाह सोहळ्यातूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचे पुढे आले असून, तालुक्यात लग्न साेहळ्यांना परवानगी न देण्याची मागणी आता जाेर धरत आहे़
मार्च महिन्यांपासून तालुक्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुणांची संख्या झपाट्याने वाढत होती़ दरम्यान, तालुक्यातील एकूण संख्या १९५१ पर्यंत जाऊन पोहचली असून, त्यामध्ये ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही ५६१ तर उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३१२ एवढी होती़ दरम्यान, तालुक्यातील कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या ७८ एवढी होती.
एप्रिलपासून मेपर्यंत दररोज सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येत मोठी वाढ होत होती़ मात्र, त्यानंतर गेल्या सात- आठ दिवसांत त्याचे प्रमाण काहीसे कमी होताना दिसत होते़ त्याचवेळी उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत होता़ त्यामुळे तालुक्यातील कोरोनाची स्थिती बदलत असतानाच तालुक्यात पुन्हा काेराेनाचे रुग्ण वाढू लागले़ त्याला कारण ठरतेय ते तालुक्यात झालेले विवाह सोहळे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, तालुक्यात आणखी काही ठिकाणी विवाह सोहळे होणार असल्याने त्यातून कोरोना पसरणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.