आंबा उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:45+5:302021-08-23T04:33:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना अधिक भरपाई मिळण्यासाठी ...

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देऊ
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना अधिक भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत सिंधुरत्न निधीतून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच आंबा उत्पादक विवेक भिडे, प्रसन्न पेठे, प्रदीप सावंत आणि कृषी उपसंचालक अजय शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तौक्ते चक्रीवादळात ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असून, याबाबत २०१५प्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबा उत्पादक संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबत पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात पीक काढणीस आले असताना पाऊस आल्याने आंबा वाया गेला हे लक्षात घेऊन याबाबत सहानुभूतीने तपासणी करुन भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करु, असे सामंत म्हणाले.
आंबा उत्पादकांना शाश्वत उत्पन्नासाठी नव्या कोल्ड स्टोअरेजची बांधणी व वातानुकूलित वाहतुकीसाठी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव पणन विभागाने २६ ऑगस्टपूर्वी तयार करावा. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी होणाऱ्या चर्चेत मागणी करुन सिंधुरत्न योजनेतून यासाठी निधी दिला जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
-------------------------
जैतापूर प्रकल्पाबाबत बैठक
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कार्यालयात काम करणाऱ्या काही स्थानिकांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे. याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. स्थानिकांना नोकरीवरुन काढण्यावरुन मंत्री उदय सामंत यांनी व्यवस्थापन प्रतिनिधींना जाब विचारला. तसेच लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देशही दिले.