कुलगुरु निवडीचा मार्ग अजून मोकळाच
By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-28T23:42:22+5:302015-10-29T00:08:11+5:30
जनहित याचिका : कार्यपद्धतीला स्थगिती दिलेली नसल्याने पुढील प्रक्रिया सुरू

कुलगुरु निवडीचा मार्ग अजून मोकळाच
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाच्या कुलगुरु निवड प्रक्रियेविरोधात डॉ. सुभानराव ढाणे यांनी जनहित याचिका दाखल केल्याने कुलगुरु निवडप्रक्रिया लांबणीवर पडणार, अशी शक्यता होती. मात्र त्यांची याचिका दाखल झाल्यानंतरही प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली नसल्याने कुलगुरू निवडीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. आठवडाभरात विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळण्याची शक्यता आहे.
२००८पासून कृ षी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक व त्यावरील पदे न भरली गेल्यामुळे कुलगुरु पदासाठी कुलगुरूपदासाठी राज्यात पात्र उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे २० डिसेंबर २०१४ रोजी होणारी कुलगुरु निवड रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. पात्र उमेदवार मिळत नसल्याने कुलगुरुपदाचे निकष बदलण्यात येऊन नव्या निकषानुसार ही निवडप्रक्रिया सुरु आहे. परंतु, दापोली कृषी विद्यापीठातील निवृत्त विभागप्रमुख डॉ. सुभानराव ढाणे यांनी या निकषाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. २० आॅक्टोबर रोजी या जनहित याचिकेची पहिली सुनावणी होती. त्या दिवशी न्यायालयाने कोणताही निकाल दिला नाही किंवा निवडप्रक्रियेला स्थगितीही दिली नाही. त्यामुळे कुलगुरुपदासाठी शेवटच्या टप्प्यातील पाच उमेदवारांच्या मुलाखती होऊन या पाचपैकी एका उमेदवाराची दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
राज्यपाल उर्वरित पाच लोकांची यादी जाहीर करतील व या पाचपैकी एका उमेदवाराची दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून वर्णी लागेल. १२ जणांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यातून पाचजणांची अंतिम यादी प्रसिद्ध होणे गरजेचे होते. परंतु, अंतिम यादी प्रसिद्ध न झाल्याने कुलगुरु निवडप्रक्रियेचे काय होणार असा प्रश्न होता. परंतु, पुन्हा निवडप्रक्रियेच्या हालचालींना वेग आल्याने येत्या आठवडाभरात कुलगुरु मिळण्याची शक्यता आहे.
यावेळी राज्यातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना संधी मिळणार की दिल्लीतील कृषी अनुसंधान परिषदेच्या व्यक्तीची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
प्राध्यापक व त्यावरील पदे न भरली गेल्यामुळे कुलगुरु पदासाठी राज्यातील कृषी विद्यापीठातील पात्र उमेदवार मिळाला नाही.
निवृत्त विभाग प्रमुख डॉ. सुभानराव ढाणे यांनी या निकषाला आवाहन देणारी याचीका केली दाखल.