कोयनेतील पाणीवाटपात फेरबदलाचे संकेत
By Admin | Updated: October 24, 2015 00:19 IST2015-10-24T00:13:36+5:302015-10-24T00:19:56+5:30
पारंपरिक पाणी वाटपात बदल केला, तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता येईल

कोयनेतील पाणीवाटपात फेरबदलाचे संकेत
पाटण : कोयना धरणात अवघा ७६.८१ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. उपलब्ध पाणी जूनपर्यंत वापरावे लागणार आहे. यासंदर्भात सांगलीत वरिष्ठ अधीक्षक अभियंत्यांनी महत्त्वपूर्ण बैठक दि. १६ रोजी घेतली होती. या बैठकीत कोयनेतील पाणी वाटपाबाबत फेरबदलाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला आहे. सध्याच्या वार्षिक करारानुसार कोयनेतील ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते, तर ३० टीएमसी पाणीसाठा सांगलीकडील शेती, सिंचन व पिण्यासाठी वापरायचे, असा नियम आहे. मात्र, यावर्षी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. पाऊस थांबला असला तरी वीजनिर्मितीचा सपाटा सुरूच आहे. सांगलीकडील पाणी मागणी वाढतच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस एक-एक टीएमसीने घटत आहे. पारंपरिक पाणी वाटपात बदल केला, तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता येईल. यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, याबाबत मोठी गोपनीयता बाळगली जात आहे. पाणी वाटपातील फेरबदलाची लवकर घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा आगामी काळात कसा वापरायचा, यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत मंत्रालय स्तरावर निर्णय होईल. सांगलीतील बैठकीची माहिती ही गोपनीय असून, त्याबाबत काहीही सांगता येणार नाही.
- ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता कोयना धरण व्यवस्थापन