रत्नागिरीकरांना मिळणार पाणीसुख!

By Admin | Updated: February 18, 2015 00:56 IST2015-02-18T00:56:39+5:302015-02-18T00:56:39+5:30

नगर परिषदेचे पाऊल पडते पुढे : पाईपलाईन बदलणार, अंदाजे ५७ कोटी रूपये खर्च

Water supply to Ratnagiri | रत्नागिरीकरांना मिळणार पाणीसुख!

रत्नागिरीकरांना मिळणार पाणीसुख!

प्रकाश वराडकर,रत्नागिरी :गेल्या सहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना पाणी पुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेतील महादोषांमुळे जो त्रास सहन करावा लागत आहे तो लवकरच दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सुजल-निर्मल अभियानअंतर्गत या कामांना निधी मिळणार असून, पाणी वितरण व्यवस्थेशी संबंधित सर्व कामांची अंदाजपत्रके नगरपरिषद या महिन्यात शासनाकडे पाठविणार आहे. या सर्व कामांसाठी ५७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वर्षभरात ही कामे पूर्ण होणार असल्याने पाण्याचे सुख मिळण्याबाबत रत्नागिरीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरण, नाचणे तलाव तसेच एमआयडीसीकडूनही पाणीपुरवठा केला जातो. यातील सर्वाधिक पाणीपुरवठा हा शीळ धरणातून होतो. गेल्या काही वर्षांपासून शीळ धरणातील ५० टक्के पाणी शहरासाठी वापरले जात होते. मात्र, अलिकडेच या धरणाचे १०० टक्के पाणी वापरण्याबाबत पालिकेने करार केला आहे. शीळ धरणात पाण्याचा मुबलक साठा असूनही गंजलेली जलवाहिनी वारंवार फुटण्याच्या समस्येमुळे पाणी असून, तहानलेले राहण्याची वेळ अनेकदा रत्नागिरीकरांवर येते. त्यामुळेच शीळ धरणाच्या जॅकवेलपासून ते पुढे २ किलोमीटर्सपर्यंत गंजलेली जलवाहिनी संपूर्णत: बदलली जाणार आहे. त्यासाठी सव्वादोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
रत्नागिरी शहराला दररोज पानवल धरणातून दीड ते दोन दललक्ष लिटर्स, शीळ धरणातून १२ दशलक्ष लिटर्स तर एमआयडिसीकडून दीड दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. नाचणे तलावातूनही काही प्रमाणात शहराला पाणी पुरवले जाते. पायाशी खचलेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत केले जाणार आहे.
शीळ धरणातून पाणी उपसा करण्यासाठी याआधीचे ३०० अश्वशक्तीचे तीन पंप बदलून २५० अश्वशक्तीचे तीन नवीन पंप बसविण्यात आले आहेत. आधीच्या पंपांची शक्ती अधिक असल्याने त्यांची आवश्यकता नसल्याचे तसेच वीजबीलही अधिक येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा बदल करण्यात आला. परिणामी पालिकेच्या वीज बिलातही घट झाल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.




 

Web Title: Water supply to Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.