पाण्याची गोष्ट (लाेकमंच)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:49+5:302021-03-22T04:27:49+5:30
नदीलगतच्या गावाशीही नदीचे जुने नातेसंबंध होते. नदीत जीव द्यायला आलेल्या पक्याला एकदा नदीनेच तळहातावर झेलत आल्या पावली परत पाठवले ...

पाण्याची गोष्ट (लाेकमंच)
नदीलगतच्या गावाशीही नदीचे जुने नातेसंबंध होते. नदीत जीव द्यायला आलेल्या पक्याला एकदा नदीनेच तळहातावर झेलत आल्या पावली परत पाठवले होते. पुढे त्याच पक्याने नदी शेजारी नारळाची बाग फुलवली तेव्हा नदीला अगदी कृतार्थ झाल्यासारखे वाटले होते. सासुरवास भोगणाऱ्या अनेक सासुरवाशिणींची भळभळती दुःखे याच नदीने अनेकवेळा घटाघटा गिळली होती. नदीवर कपडे धुण्यासाठी येणाऱ्या बायांच्या गजाली ऐकता ऐकता कधी कधी नदीला हसूही आवरत नसे. नदीमुळे काठावरची गावे आणि गावांमुळे नदी अगदी सुजलाम सुफलाम होती. गावात राहून कष्टणाऱ्या प्रत्येकाला ती मदतीचा हात देत होती. गावात साजऱ्या होणाऱ्या सर्वच सण समारंभांची नदी साक्षीदार होती. काठावरच्या गावांना नदीचा नि नदीला या गावांचा खूप अभिमान व आपुलकी होती. याच नदीच्या पाण्यावर फुललेले मळे बघून नदी मनातल्या मनात सुखावून जात होती.
काही वर्षांपूर्वी या सुंदर नदीला कोणाची तरी नजर लागली. विकासाच्या नावाखाली माणसाने नदीवर ठिकठिकाणी पूल बांधले. खूप ठिकाणी खळखळत्या नदीचा प्रवाह अडवला गेला. नदीचे चालणे फिरणेच जणू बंद झाले. काठावरच्या गावांत दोन मोठे रासायनिक कारखाने आले. कारखान्यासाठी लागणारे पाणी नदीचे काळीज पिळवटीत जाडजूड नलिकांमधून कारखान्यांत जाऊ लागले. नदीच्या पात्रात ठिकठिकाणी मोठ्या विहिरी खोदून माणसाने नदीच्या हृदयावर घाला घातला. नदीच्या अगदी मनाविरुद्ध नदीचा जीवनरस काठावरच्या घराघरांत पोचला. नदीवर कपडे धुण्यासाठी येणाऱ्या बाया आता नदीकडे फिरकेनाशा झाल्या. गायी गुरांनाही आता गोठ्यातल्या हौदातच पाणी मिळू लागले. काठावरच्या अनेक जमिनी माणसाने विकून टाकल्या. गायी गुरांसाठीची कुरणे तारांच्या वेढ्यांत बंदिस्त झाली. नदीची पोरांशी, गायी गुरांशी, बायांशी ताटातूट झाली. नदी एकटी, एकाकी पडली. नदी आतल्या आत आसवे ढाळीत राहिली. कारखान्यातील विषारी सांडपाणी माणसाने परत नदीत सोडले. काठावरची वस्तीही वाढली.
घराघरातले सांडपाणीही आता परत फिरून नदीपात्रात मिसळू लागले. नदीचे अगदी रंगरुप बदलून गेले. विषारी पाणी सहन न झाल्याने नदीच्या पाण्यात बागडणारी, पोहणारी लेकरे फटाफटा मरून पडली. आपल्याच लेकरांच्या कलेवरांचा खच पाहून नदीला हुंदके आवरणे कठीण झाले. आतापर्यंत खळाळत व बागडत येणारे झरे पुढे पुढे अर्ध्या वाटेतच धारातिर्थी पडले. जिथून झरे यायचे त्या डोंगरांत मोठ्या
प्रमाणात उत्खनन झाले, तिथेही मोठमोठी बांधकामे उभी राहिली, कसले कसले मोठ्ठाले ‘प्रकल्प’ आले. नदीचा जणू उगमच थांबला. नदीचा खळाळत वाहणारा प्रवाह आता मृतवत झाला. नदीचे निर्मळ पाणी दूषित झाले.
नदी आता मनसोक्त वाहत नाही. नदीपात्रात आता पाण्याचा खळखळाट नाही की, माशांचा सुळसुळाट नाही. नदी आता पूर्वीसारखी हसत नाही. नदीकडे आता कोणी पोरे फिरकत नाहीत. कधी एखाद्या वर्षीच्या पावसाळ्यात नदी सगळी बंधने झुगारून सगळ्या बेड्याही तोडण्याचा प्रयत्न करते. पण माणसाने बांधलेल्या शृंखलेपुढे नदीचे काही चालत नाही. बारमाही सूर मारत वाहणाऱ्या नदीचे सध्याचे रूपडे तिला स्वतःलाही बघवत नाही. कधीतरी नदीच्या पाण्याला त्याच्या भावना अनावर होतात. भूतकाळातले सारे वैभव डोळ्यांसमोर येते आणि मग पाणी हरवून जाते.... झिरपून जाते... आठवणींत!
- बाबू घाडीगांवकर, जालगांव, दापोली.