सामंजस्यातून झाली पाणीयोजना सुरु
By Admin | Updated: April 15, 2015 23:58 IST2015-04-15T21:37:12+5:302015-04-15T23:58:24+5:30
संगमेश्वर तालुका : रांगव-शेजवडेच्या ग्रामस्थांनी काढला एकमताने तोडगा--लोकमतचा प्रभाव

सामंजस्यातून झाली पाणीयोजना सुरु
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील रांगव - शेजवडे ग्रामपंचायतीने ६५ लाख रुपये खर्च करुन नळपाणी योजना राबवली. मात्र, येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेल्या विहिरीचे पैसे अदा न झाल्याने ती चालू होऊ शकली नव्हती. ही बाब दोन्हीकडच्या ग्रामस्थांनी सामंजस्याने तोडगा काढून सोडवली आहे. त्यामुळे आता दोन्ही गावांना नळपाणी योजनेचे पाणी उपलब्ध होणार आहे.रांगव - शेजवडे ग्रामपंचायतीवर गेली दोन वर्षे प्रशासक नियुक्त आहे. प्रशासनाला अपुऱ्या असलेल्या माहितीमुळे व येथील ग्रामपंचायत सदस्यांमुळे या ठिकाणी सरपंच नियुक्त होऊ शकला नाही. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ६५ लाख रुपये निधी खर्ची टाकून येथे पाणीयोजना राबवण्यात आली.
या योजनेचे काम निकृ ष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. योजनेची पाईपलाईन जमिनीवरुनच काढली असल्याने वणव्यामुळे ती जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ही योजना ज्या विहिरीवर राबवण्यात आली आहे ती विहीर रांगव मधलीवाडी, कुुंभारवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधली आहे. टंचाईग्रस्त कार्यक्रमांतर्गत या विहिरीवर २ लाख ९४ हजार रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत. मात्र, विहिरीचे काम करणाऱ्या ग्रामस्थांना यातील एकही रुपया मिळाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.रांगव ग्रामस्थांनी ही योजना चालू करण्यास याच कारणाने विरोध केला होता. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या या गावातील ग्रामस्थांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. हा गुंता आता सुटला असून, संबंधित ग्रामस्थांना काही रक्कम देऊन ही योजना चालू करण्यात आली आहे. (वार्ताहर)
रांगव - शेजवडे या दोन गावातील हा तिढा सुटता सुटत नव्हता. अखेरीस दोन्ही गावातील काही ग्रामस्थांनी ही बाब ‘लोकमत’चे मिलिंद चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबतचे वृत्त प्रकाशित होणार, अशी माहिती मिळताच दोन्ही गावांतील ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी लोकमतशी संपर्क साधून सामंजस्याने तोडगा काढण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे; यासाठी चव्हाण यांनी मध्यस्थी केली. अखेरीस या नळपाणी योजनेबाबतचा वाद मिटला आहे.