राजापुरातील ८४ गावांच्या पाणीटंचाईसाठी केवळ सव्वा काेटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:22+5:302021-04-24T04:32:22+5:30
राजापूर : तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ८४ गावांतील २४४ वाड्यांचा सुमारे २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला ...

राजापुरातील ८४ गावांच्या पाणीटंचाईसाठी केवळ सव्वा काेटी मंजूर
राजापूर : तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ८४ गावांतील २४४ वाड्यांचा सुमारे २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून केवळ सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून काही ठरावीक गावांमधील पाणीपुरवठ्याची कामे होणार असून, उर्वरित गावांची तहान कशी भागविणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या आराखड्यामध्ये त्या-त्या गावात पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाय-योजना सुचविण्यात येतात. राजापूर पंचायत समितीतर्फे यावर्षी तालुक्यातील ८४ गावातील २४४ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश करून या गाव-वाड्यांमध्ये टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चाचा जंबो आराखडा तयार केला होता. या टंचाई आराखड्यामध्ये वडवली, शिवणे बु., धोपेश्वर, देवाचेगोठणे, नाटे, शिवणे खुर्द, मोगरे, गोवळ, तेरवण, भू, कशेळी, तुळसवडे, वाटूळ, कोंडीवळे, येरडव, काजिर्डा, करक, ताम्हाणे, कोंढेतड, ओझर, रायपाटण, ओशिवळे, कोळवणखडी, वाटूळ, परटवली, परूळे, मूर, झर्ये, मिळंद, सावडाव, पाचल, मिठगवाणे, साखरीनाटे, साखर, कारवली, मोसम, डोंगर, गोठणेदोनिवडे, हरळ, पुंभवडे, हसोळतर्फ सौंदळ, सोल्ये, जवळेथर, केळवली, कोदवली, मोरोशी, शिळ, ओणी, गोवळ, उन्हाळे, पेंडखळे, तळगाव, कोंडये, दोनिवडे, पडवे, दळे, मठखुर्द, आंगले, मोसम, आडवली, वडदहसोळ, येळवण, हातदे, कुवेशी, आजिवली, खरवते, सौंदळ, जैतापूर, धाऊलवल्ली, सागवे, महाळुंगे, भालावली, जुवाठी, जुवेजैतापूर, तळवडे, तारळ, चौके, कळसवळी, वाडापेठ, राजवाडी, विलये, नाणार, अणसुरे व चिखलगाव या गावांचा समावेश आहे.
या गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यासाठी विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजना दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती, नळपाणी योजना नवीन करणे, सार्वजनिक विहिरी खोदणे, दुरुस्ती करणे, साठवण टाकी बांधणे, दुरुस्ती करणे, बंधारे बांधणे, गाळ उपसणे, तसेच आवश्यकता भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करणे अशी ढीगभर कामे सुचविण्यात आली होती. राजापूर पंचायत समितीने सुचविलेल्या या ढीगभर कामांसाठी जिल्हा परिषदेने केवळ मूठभर निधी मंजूर केल्याने हा आराखडा केवळ दिखावा ठरला आहे. पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या १९ कोटी ४६ लाख रुपयांच्या टंचाई आराखड्यापोटी जिल्हा परिषदेकडून केवळ १ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून २४४ वाड्यांपैकी काही ठरावीक वाड्यांमध्येच पाणीपुरवठ्याची कामे होणार आहे.