‘आरजीपीपीएल’मुळे पाणी प्रदूषित, पाणीपुरवठ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:39+5:302021-04-25T04:31:39+5:30
गुहागर : आरजीपीपीएल कंपनीमुळे अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी प्रदूषित झाले असल्याने येथील प्रदूषणग्रस्त भागाला कंपनीने तातडीने पाणीपुरवठा ...

‘आरजीपीपीएल’मुळे पाणी प्रदूषित, पाणीपुरवठ्याची मागणी
गुहागर : आरजीपीपीएल कंपनीमुळे अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी प्रदूषित झाले असल्याने येथील प्रदूषणग्रस्त भागाला कंपनीने तातडीने पाणीपुरवठा करावा आणि प्रदूषित घरांना कंपनीने स्वखर्चाने विहीर किंवा बोअरवेलद्वारे पाईपलाईनने प्रत्येकाच्या घरी पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पत्राद्वारे कंपनी प्रशासनाकडे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी पिण्यास अयोग्य आणि पूर्ण प्रदूषित झाले असून, यामध्ये क्षारयुक्त असे अनावश्यक घटक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण, फूड हायजिन आणि हेल्थ लॅबोरेटरी पुणे या संस्थेने दिलेल्या अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. हे प्रदूषित पाणी वापरल्यास येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. आरजीपीपीएल कंपनीच्या प्रदूषित पाण्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
आरजीपीपीएल कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी झिरपल्यामुळे फेब्रुवारी २०२१ पासून येथील नैसर्गिक स्रोत दूषित झाल्याची तक्रार २९ मार्च रोजी पत्राद्वारे प्रशासनाला केली होती. गेला महिनाभर कंपनी प्रशासनाने पाणी नमुने गोळा करण्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही ठोस कारवाई केली नाही. ग्रामस्थांच्या पत्राला उत्तरही दिले नाही. ग्रामस्थांनी मागूनही पाणी नमुने अहवाल दिले नाहीत. अखेर ग्रामस्थांनी येथील पाणी नमुने दिल्यानंतर हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अशाच प्रकारचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळालाही आला आहे. प्रदूषण आमच्यामुळे झालेच नाही असा कंपनी प्रशासनाचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामुळे खोटा असल्याचे आता पुढे आले आहे.