संगमेश्वरची पाणीपातळी घटली
By Admin | Updated: May 21, 2015 00:08 IST2015-05-20T22:00:01+5:302015-05-21T00:08:14+5:30
पंचायत समिती : १६ गावातील ९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ

संगमेश्वरची पाणीपातळी घटली
देवरुख : वाढत्या उष्णतेमुळे संगमेश्वर तालुक्यात पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच पाण्याचे स्रोतही आटू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होत आहे. सध्या १६ गावांतील ९ वाड्यांना पाण्याची तीव्रता भासू लागली असून, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तालुक्यातील १७ गावे आणि २३ वाड्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तालुक्यात यावर्षी पहिला टँकर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाला. मात्र, पाणीटंचाईची झळ मार्च अखेरपासूनच चालू झाली होती. आता पाणीटंचाईची ही भीषणता दिवसागणीक वाढत आहे. १६ गावांतील २२ वाड्यांसाठी केवळ तीन टँकर तहान भागवण्यासाठी धावत आहेत.
पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या आणि वाढत्या उन्हाचा विचार करता किमान ४-५ टँकरची आवश्यकता आहे. मात्र, सध्या तीन टँकर्सवरच काम रेटून नेले जात आहे. या तीन टँकरमध्ये २ शासकीय व १ खासगी टँकरचा समावेश आहे. यापलिकडे काही गावांना पाणीटंचाई भासत आहे. मात्र त्या गावांनी टँकरची मागणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
कडवई घोसाळकरकोंड, पुर्येतर्फे देवळे, चव्हाणवाडी, बेलारी माचीवाडी, फुणगूस घडशीवाडी, धामापूरतर्फ देवरुख, पाचांबे, नेदरवाडी, दखीणपेठ, मेढे, निवळी धनगरवाडी, असुर्डेतील भिरकोंड, साखळकोंड, रांगवमधील गवळवाडी, धनगरवडी, शेनवडे, गवळवाडी तसेच सायले बौद्धवाडी, राजिवली येडगेवाडी, मधलीवाडी या गावांचा आणि वाड्यांचा पाणीटंचाईग्रस्तांमध्ये समावेश आहे.
याखेरीज अजूनही काही गावांना पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. त्यांनी टँकरसाठी मागणी नोंदवली आहे. तालुक्यातील तांबेडी - धनगरवाडीतही टँकरची मागणी होत आहे. प्रस्ताव तयार झाला असून, पाहाणीनंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर्षी उन्हाचा पारा अधिकच वाढत असून, नागरिक पुरते हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)