प्रभाग आरक्षण जाहीर

By Admin | Updated: February 2, 2015 00:08 IST2015-02-01T21:05:39+5:302015-02-02T00:08:51+5:30

दाभोळ ग्रामपंचायत : ‘महिला राज’मुळे इच्छुकांच्या पोटात गोळा

Ward Reservation Announced | प्रभाग आरक्षण जाहीर

प्रभाग आरक्षण जाहीर

दाभोळ : दापोली तालुक्यातील दाभोळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाभोळ सजाचे मंडल अधिकारी सुनील येलवे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जागांसाठीचे आरक्षण ग्रामपंचायत कार्यालयात निश्चित करण्यात आले. या आरक्षणामध्ये महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुरुष इच्छुकांची मोठी गोची झाली आहे. आता दाभोळ ग्रामपंचायत निवडणूक एप्रिल ते मे या दरम्यान होण्याची शक्यता वर्तविली जात असून, निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. दाभोळ गावाची लोकसंख्या ७०३८ आहे.दाभोळ ग्रामपंचायतीची चिठीद्वारे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रभाग क्र. ६ रद्द झाला असून, एकूण पाच प्रभागात निवडणूक १५ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण झाल्याने यावर्षी आठ स्त्रिया आणि सात पुरुष असा बदल झाला आहे. प्रभाग क्र. ६ हा प्रभाग क्र. ५ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने येथील इच्छुकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. महिला आरक्षणाने अनेक पुरुष उमेदवारांचे पत्ते आपोआप कट झाले आहेत. ग्रामपंचायतीची सदस्यसंख्याही आता कमी झाली आहे. पूर्वी या ग्रामपंचायतीत १७ सदस्य होते. आता नवीन धोरणानुसार येथील सदस्यांची संख्या १७ वरुन १५ वर आली आहे. दाभोळ ग्रामपंचायतीसाठी प्रभागानुसार चिठीद्वारे आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग क्र. १ नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष १, राखीव महिला १, सर्वसाधारण स्त्री किंवा पुरुष १, प्रभाग क्र. २ नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष १, राखीव स्त्री २, प्रभाग क्र. ३ सर्वसाधारण २, स्त्री १, प्रभाग क्र. ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, राखीव महिला १, सर्वसाधारण १, प्रभाग क्र. ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, राखीव महिला १, सर्वसाधारण १ असे आरक्षण आहे. आरक्षण जाहीर झाल्याने सर्व पक्षांकडून निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी हाती घेण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. (वार्ताहर)

आतापासूनच आडाखे
यावेळी ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता असल्याने अनेक इच्छुक पुरूष उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. दाभोळची लोकसंख्या ७०३८ इतकी असून, या निवडणुकीकडे परिसरातील महत्त्वाची निवडणूक म्हणून पाहिले जाते. आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांनी आडाखे बांधायला सुरूवात केली आहे.


सर्वांचे लक्ष...
तालुक्यातील महत्त्वाचे व अनेक वेळा चर्चेचे केंद्र असणारी दाभोळ ग्रामपंचायत ताब्यात राहावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष सहभागी होतात. यावेळीही अशाच स्वरूपाची ही निवडणूक होत असून, यावेळी ती प्रतिष्ठेची ठरली आहे. सध्या ग्रामपंचायतीचे प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यामुळे निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ward Reservation Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.